सईबाई राणीसाहेब भोसले यांच्या स्मारकाच्या माध्यमातून पालचा विकास करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:58+5:302021-09-06T04:43:58+5:30
फलटण : ‘वेल्हे तालुक्यातील पाल येथे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या प्रथम पत्नी व छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या मातोश्री छत्रपती ...

सईबाई राणीसाहेब भोसले यांच्या स्मारकाच्या माध्यमातून पालचा विकास करणार
फलटण : ‘वेल्हे तालुक्यातील पाल येथे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या प्रथम पत्नी व छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या मातोश्री छत्रपती सईबाई राणीसाहेब भोसले यांची समाधी आहे. अनेक वर्षे समाधी परिसर दुर्लक्षित होता. या ठिकाणी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब भोसले यांच्या स्मारकाच्या माध्यमातून पालसह परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार आहे,’ अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
पाल (ता. वेल्हे) येथे श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब भोसले यांच्या समाधी स्मारकाचे भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, अरविंद पासलकर, पालचे सरपंच गोरख शिर्के, कुलदीप कोंडे, बापूसाहेब धुमाळ, करणसिंह बांदल, अण्णा देशमाने, दत्ताजी नलावडे, प्रदिप मरळ, सौरभ आमराळे, अमोल पाटणकर उपस्थिती होती.
रामराजे म्हणाले, ‘सईबाई राणीसाहेबांच्या समाधीच्या स्मारकाच्याबाबतीत पुढील जबाबदारी मी उचलली आहे. या गावाला पर्यटनस्थळ म्हणूनच विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. समाधी किंवा स्मारक बांधून उपयोग नाही तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. फलटणलाही ऐतिहासिक वारसा आहे. मुरुम गावामध्ये मल्हारराव होळकर यांचे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे काम हे कायम स्मरणात राहील. आता पुढील कामासाठी मी तयारीला लागलेलो आहे. भविष्यात गावकऱ्यांची मदत गरजेचीच आहे.’
संजीवराजे म्हणाले, ‘श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांच्या स्मरण दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. मावळचा इतिहास कुणी वेगळा सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा इतिहास हा वेगळा नसून एकत्रितपणेच पुढे जात आहे. लहानपणी शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत होतो. इतिहासाच्या खाणा-खुणांचे जतन केले नाही तर काळाच्या ओघात गडप होण्याची शक्यता आहे.’
नानासाहेब धुमाळ यांचे भाषण झाले. गणेश खुटवड-पाटील यांनी प्रास्तविक केले. वास्तुरचनाकार अमोल पाटणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
०५रामराजे
पाल येथे श्रीमंत सईबाई महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते.