सातारा : ‘माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी भरभरून दिले. मी त्यांचा विश्वास वाया जाऊ देणार नाही. माझ्यासाठी कष्टकरी जनतेने घरातून चटणी भाकरी बांधून आणली आणि माझा प्रचार केला. हे मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी आता दुष्काळ निवारणाला प्राधान्य देणार आहे,’ अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून लढलेले सदाभाऊ खोत यांनी सोमवारी ‘लोकमत’च्या सातारा कार्यालयाला भेट दिली आणि संपादकीय विभागातील सहकार्यांशी दिलखुलास संवांद साधला. सदाभाऊ म्हणाले, ‘ज्याठिकाणी मताधिक्याची अपेक्षा नव्हती तेथून मताधिक्य मिळाले. मात्र जेथून अपेक्षा होती तेथे थोडे कमी मताधिक्य मिळाले. जे सुरुवातीला बरोबर होते त्यांनी अंतिम टप्प्यात साथ दिली नाही. माझ्या पराभवाचे प्रमुख कारण हेदेखील एक आहे.’ पराभवाने मी खचून जाणार नसल्याचे सांगत सदाभाऊ म्हणाले, ‘माण, खटाव तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीला माझे प्राधान्य आहे. दुष्काळ निवारणासाठी एक कृती कार्यक्रम आखणार असून यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेणार आहे. त्यांना या भागात आणून लोकांना दुष्काळावर कशी मात करता येईल, यावर मार्गदर्शन करणार आहे. पीकपध्दती, कृषीपूरक उद्योग, दूग्ध व्यवसाय त्याचबरोबर इतर व्यवसाय येथे कसे वाढीस लागतील, यावरही आम्ही भर देणार आहे.’ (प्रतिनिधी)
दुष्काळ निवारणाला प्राधान्य देणार सदाभाऊ खोत
By admin | Updated: May 27, 2014 01:24 IST