काँग्रेसच्या जिल्ह्यामधील व्यथा आज प्रदेश बैठकीत
By Admin | Updated: November 5, 2014 00:03 IST2014-11-04T22:11:27+5:302014-11-05T00:03:19+5:30
मुंबईत बैठक : तासगाव, कवठेमहांकाळ, सांगलीबाबत गंभीर मुद्दे

काँग्रेसच्या जिल्ह्यामधील व्यथा आज प्रदेश बैठकीत
सांगली : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉँग्रेसला आलेल्या अपयशाची कारणमीमांसा उद्या (बुधवारी) प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली जाणार आहे. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याकडून जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील लेखाजोखा अहवाल स्वरुपात मांडण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यात बंडखोरी, छुप्या पद्धतीने विरोधी उमेदवाराला मदत करणे, पक्षीय उमेदवाराला अडचणी निर्माण करणे, असे अनेक प्रकार घडले आहेत. याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना प्रदेश कार्यकारिणीने जिल्हाध्यक्षांना दिल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक तालुकानिहाय घडामोडींची माहिती जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी संकलित केली आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ येथील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवाईबद्दल गंभीर उल्लेख अहवालात करण्यात आल्याचे समजते. सागंलीतील शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांच्याबाबतचाही उल्लेख अहवालात असल्याचे समजते.
प्रदेश कार्यकारिणीची बैठक उद्या, बुधवारी मुंबईत होत आहे. बैठकीत राज्यातील सर्वच जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे बंडखोरीचा विषय या बैठकीत गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.
सांगली जिल्ह्यातील एकूण आठ जागांपैकी सांगलीला पतंगराव कदमांच्या माध्यमातून एकाच जागेवर विजय मिळविता आला. कॉँग्रेसचा बालेकिल्ला असूनही गेल्या काही वर्षांपासून पक्षाचा विजयाचा आलेख घटत आला आहे. गत विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले होते. आता एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. सांगलीतील उमेदवाराचा पराभव कॉँग्रेसला सर्वाधिक जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे याठिकाणी झालेल्या बंडखोरीची चर्चा प्रदेशच्या बैठकीत होण्याची चिन्हे आहेत. सांगलीत माजी शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे आणि दिगंबर जाधव यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्यावर कोणती कारवाई करायची, याबाबतही प्रदेश कार्यकारिणीमार्फत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष आता या बैठकीकडे लागले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यकारिणीला स्वतंत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट सांगितले होते. स्वतंत्रपणे आठ जागा लढवूनही जिल्ह्यात एकच जागा कशी जिंकता आली, याची विचारणा प्रदेशच्या बैठकीत होणार असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
कुलूप तोडून कार्यालयात केला प्रवेश
काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मुन्ना कुरणे यांच्याजागी पृथ्वीराज पाटील यांची निवड झाल्यानंतर आज त्यांचा अधिकृत कार्यालय प्रवेश पार पडला. मात्र त्यासाठी कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागली. शोधाशोध करूनही कार्यालयाची किल्लीच न सापडल्याने अखेर कुलूप तोडून त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. मुन्ना कुरणे यांच्याकडे व सचिवांकडे कार्यालयाच्या किल्ल्या होत्या. ऐनवेळी नव्या शहर जिल्हाध्यक्षांना कार्यालय प्रवेश करताना किल्लीची अडचण निर्माण झाली. कुरणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही शोधाशोध केली. अखेर किल्ली न मिळाल्याने कार्यालयाचे कुलूप तोडण्यात आले. कुरणे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले की, कार्यालयाच्या चार किल्ल्या होत्या. माझ्याकडील किल्ली सापडली नाही. जाणीवपूर्व काही गोष्टी घडल्या नाहीत. उलट माझ्या छायाचित्रांच्या जागी पृथ्वीराज पाटील यांचे छायाचित्र लावण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली होती. त्यानुसार तसे बदलही केले गेले. पक्षावर माझा कोणताही रोष नाही.