एस. टी.कडून मनुष्य ते माल वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:25+5:302021-09-12T04:44:25+5:30
- जगदीश कोष्टी सातारा जिल्ह्यात भौगोलिक विविधता अनुभवायला मिळते. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांचा भाग सपाट असल्याने एस. टी. ...

एस. टी.कडून मनुष्य ते माल वाहतूक
- जगदीश कोष्टी
सातारा जिल्ह्यात भौगोलिक विविधता अनुभवायला मिळते. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांचा भाग सपाट असल्याने एस. टी. धावत होती. पण त्याचवेळी सातारा जिल्ह्यातून सह्याद्रीच्या डोंगररांगा गेल्या आहेत. पाटण, परळी, बामणोली, महाबळेश्वर तालुक्यासह जावळी खोऱ्यात दुर्गम गावं आहेत. अनेक ठिकाणी जाण्यासाठी धड रस्ताही नाही. अशा भागातही गावं एस. टी. महामंडळाने संपर्काच्या दृष्टीकोनातून जोडली होती. ज्या भागातून एस. टी. वाहतूक करणे अवघड आहे. अवघड वळणामुळे गाडी जात नव्हती. त्याचप्रमाणे गावे छोटी असल्याने प्रवासी कमी मिळत होते. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी एस. टी. महामंडळाने ताफ्यात मिनी गाड्या आणल्या होत्या. त्यामुळे दुर्गम भागात एस. टी.नं वाहतुकीचं जाळं विणलं होतं. विविध सुविधांमुळे एस. टी. महामंडळ पूर्णपणे फायद्यात चालले होते.
काही दशकांपूर्वी एस. टी. महामंडळ तोट्यात असल्याच्या वावड्या उडत होत्या. तरीही त्यातून बाहेर काढण्यासाठी सातारा विभागातील प्रत्येक विभाग नियंत्रकांनी विविध प्रयोग केले आहेत. सातारकरांची पुणे, मुंबईशी चांगली नाळ जुळली आहे. जिल्ह्यातील हजारो तरुण रोजगारासाठी मुंबईत गेले. तेथे जाऊन माथाडी कामगार म्हणून काम करत आहेत. त्याचप्रमाणे नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने ते पुणे-मुंबईत गेले आहेत. त्यामुळे सातारकरांची या दोन शहरांशी नाळ जोडली गेली आहे. दररोज हजारो प्रवासी पुणे-मुंबईला जात असतात. हेच ओळखून तत्कालीन विभागीय वाहतूक अधिकारी प्रतापसिंह सावंत यांनी सातारा - स्वारगेट, सातारा - मुंबई, सातारा - बोरिवली या विनाथांबा गाड्या सुरू केल्या. त्यामुळे हा विभाग आजही उत्पन्न मिळवून देणारी सोन्याची कोंबडी ठरत आहे.
यात्रा, जत्रा, सणवार अगदी पर्यटन हंगामात जादा वाहतूक करुन दररोज कोट्यवधींचा भरणा राज्य शासनाच्या तिजोरीत होत होता. अशातच मार्च २०२०मध्ये राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. मुंबईत रुग्ण वाढू लागले. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू नये, यासाठी राज्य शासनाला काही कटू निर्णय घ्यावे लागले. त्यातीलच एक म्हणजे सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करावी लागली. या निर्णयामुळे एस. टी.ला ‘ब्रेक’ लागला. पण दुसरीकडे कोरोनामुळे संचारबंदी केल्याने कोणीही बाहेर पडण्यास धजावत नव्हते. त्यामुळे एस. टी.ची वाहतूक थांबली. उत्पन्न पूर्णपणे थांबले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार करणेही एस. टी.ला अवघड होऊ लागले. चार महिने पगार थांबल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती.
महामंडळाला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सवलत मूल्याची थकीत रक्कम, भविष्यात देय होणारी सवलत मूल्याची रक्कम महामंडळाला देऊन तात्पुरती उपाययोजना केली. दररोज २३ कोटींचे उत्पन्न आणणाऱ्या एस. टी.ला ही तुटपुंजी मदत होती. परंतु, महामंडळ डगमगले नाही. कोरोना महामारीमध्ये आपल्या जीवावर उदार होऊन कर्मचाऱ्यांनी परप्रांतीय मजुरांना, परराज्यातील विद्यार्थी यांना त्यांच्या राज्यात सोडण्याचे व आणण्याचे काम केले. एस. टी. आणि रेल्वे या दोन्हीतून जागा मिळेल, तसे परप्रांतीय मायभूमीत परतण्यासाठी धडपडत होते. साताऱ्याची लालपरी चक्क पश्चिम बंगालच्या सीमेपर्यंत धावली. सर्वाधिक ४ हजार ६०० किलोमीटरचं हे अंतर अवघ्या पाच दिवसात पूर्ण करून साताऱ्याचं नाव देशात गाजविण्याचा पराक्रम सातारा आगाराच्या सुरेश जगताप आणि संतोष निंबाळकर या दोन चालकांनी केला आहे.