मदनदादांच्या समर्थनार्थ धावले नाना
By Admin | Updated: August 3, 2014 22:45 IST2014-08-03T21:41:08+5:302014-08-03T22:45:26+5:30
आनंदराव पाटील म्हणतात : काँग्रेस नेत्यांच्या बाबतीत विनाकारण संभ्रम नको

मदनदादांच्या समर्थनार्थ धावले नाना
सातारा : ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसची राज्यपातळीवर आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर कटुता जरूर आहे. घराच्या एका आढ्याखाली दोन चौकटी आहेत. त्यामुळे घरच बदलण्याइतका टोकाचा संघर्ष कधी होणार नाही. मदन भोसले त्याच विचारधारेने पुढे जात असून, अशावेळी ते दुसरी वाट चोखाळतील याचा कुणी स्वप्नातही विचार करू नये,’ असा खुलासा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार आनंदराव पाटील यांनी केला आहे.
वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते मदन भोसले भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट पक्षनिरीक्षक गोविंद केंद्रे यांनी केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस भवनातून एक प्रसिध्दीपत्रक काढून खुलासा केला आहे. ‘निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसच्या जबाबदार नेत्यांच्या भूमिकांबाबत कोणीही संभ्रम करू नये,’ असे आवाहनाही यावेळी त्यांनी केले आहे.
काँग्रेस भवनातून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मदन भोसले यांच्यासारखा नेता काँग्रेस विचारधार कधी सोडून जाणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला कौल मिळाला असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता त्यांना काबीज करावयाची आहे. मात्र, त्यांच्याकडे असलेले नेते लक्षात घेता त्यांना ही निवडणूक जिंकता येणार नाही. त्यातूनच त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून केंद्रे यांनी मदन भोसले यांच्या अनुषंगाने वक्तव्य केले. केंद्रे यांना पश्चिम महाराष्ट्राचे राजकीय मानस कधी लक्षात येणार नाही.
मदन भोसले जिल्हा काँग्रेसचे नेते आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय भरीव कामगिरी केली असून काँग्रेस विचारधारा मानून त्यांनी आपली वाटचाल पुढे कायम ठेवली आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कटूता असलीतरी राज्यपातळीवर मात्र आमची आघाडी आहे. घराच्या एका आढ्याखाली दोन चौकटी जरुर आहेत. मात्र, घर बदलण्याइतपत आमच्या कधी संघर्ष होणार नाही. कारण काँग्रेस विचारधारेने नेहमी लोकहिताची कामे करण्याचा विचार जोपासला असल्याचे पाटील यांची स्पष्ट केले. माजी आमदार मदन भोसले दुसरी वाट चोखाळतील याचा कोणी स्वप्नात देखील विचार करू नये. ‘आम्ही इथवर आलो, त्यापाठीमागे मोठी तपश्चर्या आहे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. मात्र, राजकीय विचार आणि मतांचा विषय येतो त्यावेळी मार्ग भिन्न असतात.’ (प्रतिनिधी)
भाजपला सबुरीने घेण्याचा सल्ला
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने माजी आमदार मदन भोसले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, काँग्रेस भवनातून आनंदराव पाटील यांनी एक पत्रक काढून मदन भोसले यांची बाजू सावरून घेतली असून, भाजपच्या नेत्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.