बिबट्यासह बछड्यांना लावले पळवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:44+5:302021-05-23T04:38:44+5:30
तळमावले : भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांना साईकडे (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी हुसकावून लावले. येथील यादव ...

बिबट्यासह बछड्यांना लावले पळवून
तळमावले : भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांना साईकडे (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी हुसकावून लावले. येथील यादव मळ्यात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साईकडे परिसरात पंधरा दिवसांपासून बिबट्याचा दोन बछड्यांसह वावर आहे. पाळीव श्वान, तसेच परिसरातील काही जनावरांवरही त्याने हल्ला केला आहे. गणेश मळ्यातही ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. यादव मळ्यात बिबट्या दिसल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावले.
कार्वे ते धानाई मंदिर रस्त्याची दुरवस्था
कार्वे : येथील धानाई मंदिर मार्गाची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता खचला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. या परिसरातील शेतकरी, तसेच वाहन चालकांकडून या मार्गाचा वापर होतो. टेंभू तसेच कार्वे चौकीकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असल्याने हा रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कऱ्हाड ते ओगलेवाडी या मार्गाला हा पर्यायी रस्ता आहे.
आटके विभागात मशागत रखडली
कऱ्हाड : गत काही दिवसांत झालेला वळीव पाऊस आणि त्यानंतर गत आठवड्यात चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर पडलेल्या पावसाने आटके (ता. कऱ्हाड) परिसरातील मशागती रखडल्या आहेत. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे पावसाळापूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. गत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गावोगावी विलगीकरण कक्षांची गरज
कऱ्हाड : जिल्ह्यासह कऱ्हाड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष उभारणे गरजेचे आहे. क्वारंटाईन असणाऱ्या ग्रामस्थांसाठी शाळा खोल्या आरक्षित करीत विलगीकरण कक्ष केल्यास कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत होईल. ग्रामस्थांसह गावोगावच्या ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
धोकादायक विद्युत खांब हटवा
सणबूर : मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथील मार्गालगत असलेला वीज खांब धोकादायक स्थितीत आहे. हा खांब वाकला असून, त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. खांबाची दुरुस्ती करावी अथवा तो खांब हटवून नवीन खांब बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कोरेगाव रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
कऱ्हाड : कार्वेपासून कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. मात्र, निधी दिला जात नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. पंधरा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम झाले. तेव्हापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तसेच या रस्त्यासाठी निधीही मिळालेला नाही. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
केंजळ ते कवठे रस्ता धोकादायक
कऱ्हाड : तालुक्यातील केंजळ ते कवठे रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय प्रल्हाद यादव यांनी पत्रकाद्वारे केली आहे. या रस्त्याची गत कित्येक वर्षांपासून डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.