अफवांचं भूत सातारकरांच्या मानगुटीवर !

By Admin | Updated: June 11, 2014 00:57 IST2014-06-11T00:53:47+5:302014-06-11T00:57:01+5:30

सातारा : कधी राष्ट्रपुरुषांचा अवमान, तर कधी अवमान करणाऱ्याला अटक. कधी प्रार्थनास्थळ आणि जेसीबी तर कधी मान्यवर व्यक्तीच्या प्रकृतीसंबंधी वावड्या.

Rumors of Satkharkar! | अफवांचं भूत सातारकरांच्या मानगुटीवर !

अफवांचं भूत सातारकरांच्या मानगुटीवर !

सातारा : कधी राष्ट्रपुरुषांचा अवमान, तर कधी अवमान करणाऱ्याला अटक. कधी प्रार्थनास्थळ आणि जेसीबी तर कधी मान्यवर व्यक्तीच्या प्रकृतीसंबंधी वावड्या. आठवडा फक्त अफवांचाच. सातारा अक्षरश: धावतोय अफवांमागे. काय खरं, काय खोटं जाणून घेताना झालीय दमछाक. अशात खरोखर एखादी घटना घडलीच, तरी त्यावर विश्वास ठेवायचा की नाही, असा संभ्रम सातारकरांना पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या शनिवारपासून साताऱ्यात घडणाऱ्या घटनांचा आलेख पाहिला, तर एक गोष्ट चटकन लक्षात येते, ती म्हणजे सोशल मीडिया असो वा सांगोवांगी समजलेली गोष्ट असो, सातारकर केवळ बातमीची खातरजमा करण्यासाठी धावतो आहे. एखादी बातमी कुणाला ‘पेरायची’ असेल तर ती ‘पसरण्याचा’ वेग किती याची कुणीतरी ‘चाचणी’ घेत असल्याची शंका यावी, अशा अवस्थेतून सातारा शहर सध्या चालले आहे.
महापुरुषांबद्दल अवमानास्पद ‘पोस्ट’ सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाल्यानंतर आठवडाभर अफवांचं पीक फोफावत गेलं. ‘पोस्ट’ टाकणाऱ्या व्यक्तीचं वर्णन (अर्थातच खोटं) त्याच्या जातिधर्मासह प्रसिद्ध झालं. छत्रपती शिवरायांशी संबंधित ही घटना असल्याने त्यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचाही वापर करून अफवा पसरविण्यात आल्या. इंडोनेशियामधील भूकंपात उद््ध्वस्त झालेल्या प्रार्थनास्थळाचं छायाचित्र सोशल मीडियावर ‘पोस्ट’ करून त्याचा संबंध उदयनराजेंशी जोडला गेला. उदयनराजेंनी त्याविषयी पत्रक काढून छत्रपती घराण्याच्या धर्मनिरपेक्ष परंपरेची जाणीव करून दिली. अफवा पसरविणाऱ्यांचा माग काढायला पोलिसांनी सुरुवात केली, तेवढ्यात आणखी एक आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसिद्ध झाली. पुन्हा तणाव!
याच आठवड्यात गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. या घटनेसह आक्षेपार्ह ‘पोस्ट’च्या दोन कारणांवरून आठवड्यात तीनदा ‘सातारा बंद’ ठेवण्यात आला. अनेक ठिकाणी जाळपोळ, हल्ले, मारहाण, दगडफेक असे प्रकार घडले.
हे सर्व घडत असतानाच सोमवारी (दि. ९) रात्रीपासून रविवारी दिवसभर साताऱ्यात आणखी एक अफवा फिरत राहिली. मान्यवर स्थानिक व्यक्तीच्या प्रकृतीसंबंधीची ही अफवा सोशल मीडियावर तर होतीच; पण ती कानोकानी अधिक पसरत गेली. हे सारं आपोआप घडत गेलं की कुणी मुद्दाम घडवलं, याचा अंदाज मंगळवारी संध्याकाळपर्यंत कुणालाच नव्हता.
सोशल मीडियावर नजर असल्यामुळं ही अफवा कर्णोपकर्णीच अधिक पसरली. बातमीची खातरजमा करण्यासाठी ‘लोकमत’च्या कार्यालयातला दूरध्वनी मंगळवारी दिवसभर खणखणत राहिला. उद्या खरोखर एखादी गंभीर घटना घडली, तर ‘लांडगा आला रे आला’ सारखी सातारकरांची गत होऊ शकते, याचंही भान संबंधितांना राहिलं नाही. लांडगा नाही, तरी एखादा बिबट्या मात्र शहरात किंवा शहराजवळच्या मानवी वस्तीत कधीही येऊ शकतो, इतका तो सातारकरांच्या जवळ आहे, हे स्पष्ट झालंय. परंतु असा प्रसंग गुदरला तर बातमी खरी की खोटी या विचारचक्रात अडकून सातारकर अडचणीत येऊ शकतात. ‘अफवांवर विश्वास ठेवू नका,’ असं आवाहन वारंवार केलं जात असलं, तरी समजलेली माहिती खरी की अफवा, हा मुद्दा उरतोच; त्यामुळं मिळालेल्या माहितीची शहानिशा होईपर्यंत तोंड बंद (आणि व्हॉट्स-अ‍ॅपवर नियंत्रण) ठेवण्याचाच पर्याय सध्या सातारकरांपुढे आहे.
अरुणाराजेंची प्रकृती ठणठणीत
‘अजिंक्य उद्योग समूहाच्या मार्गदर्शक आणि आमच्या मातोश्री अरूणाराजे भोसले यांची तब्येत उत्तम आहे. त्यांच्या तब्येतीबाबत सोशल नेटवर्क व व्हॉटस् अ‍ॅपवरून चुकीची माहिती प्रसारित होत आहे. या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. ‘अरूणाराजे भोसले यांच्या तब्येतीबाबत सोशल नेटवर्क, व्हॉटस्-अ‍ॅपवरून चुकीची माहिती प्रसारित झाल्याने समाजात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, त्यांची तब्येत चांगली असून त्यांना कोणत्याही रूग्णालयात दाखल केलेले नाही. त्या निवासस्थानीच सुखरूप आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत काळजी करू नये,’ अशी विनंतीही आमदार शिवेंद्रसिंंहराजे यांनी केली आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी अरुणाराजे यांनी मोटारीतून नेहमीप्रमाणे शहरामधून फेरफटका मारला आणि त्या शेळकेवाडी येथील फार्म हाउसवरही गेल्या. नेहमीप्रमाणे तेथे पाहणी करून त्या परतल्या. मोटारीतून त्यांना जाताना अनेकांनी पाहिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. (प्रतिनिधी)

Web Title: Rumors of Satkharkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.