खडकाळ माळरानाला लाभली स्ट्रॉबेरीची लाली!
By Admin | Updated: December 26, 2014 23:54 IST2014-12-26T22:04:56+5:302014-12-26T23:54:13+5:30
घोटेघरला अनोखा प्रयोग : रामदास महाडिकांच्या कष्टाचे चीज

खडकाळ माळरानाला लाभली स्ट्रॉबेरीची लाली!
कुडाळ : मुंबईची रोजची धावपळ, दगदग सहन करूनही प्रपंच भागत नव्हता. सूर्योदयापासून सुरू होणारा कष्टाचा प्रवास दिवसाच्या अस्तानंतरही फारसा समाधानकारक ठरत नव्हता. गावाकडे परतावे की मुंबईत राहावे, अशी द्विधा मन:स्थिती होती. अखेर मुंबईतले बिऱ्हाड गावाकडे हलविण्याचा निर्णय घेतला. अन् मेहनतीने खडकाळ रानावर स्ट्रॉबेरी रुजवली. ही कथा आहे, जावळी तालुक्यातील घोटेघर येथील रामदास महाडिक यांच्या कष्टाची.
रामदास महाडिक यांचे शिक्षण पाचवीपर्यंतच झाले होते. वडिलोपार्जित शेती अगदीच कमी होती. तीन भावांचा निभाव लागणे कठीण होते. म्हणून त्यांनी उदरनिर्वाहसाठी थेट मध्यप्रदेश गाठले. तेथून मुंबईत आले. मुंबईत दिवसरात्र कष्ट उपसून काही रक्कम जमविली. भरतकामाच्या चार मशीन विकत घेतल्या. भांडूपमध्ये कारागिरांच्या मदतीने भरतकामात जम बसविण्यात सुरुवात केली.
अशातच झालेली फसवणूक रोजीरोटीला धक्का आणि मनाला चटका देऊन गेली. तेथून महाडिक आणि पत्नी सुनीता यांच्या वाट्याला पुन्हा काबाडकष्ट आले; परंतु हाती मात्र फारसे लागत नव्हते. त्याची सल मनाला सारखी बोचत होती. मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला होता. यातूनच मुंबई सोडली.
मेढा-पाचगणी रस्त्यावर काहीशा आतल्या बाजूची ५३ गुंठे खडकाळ जमीन विकत घेतली. तिथे झाडाझुडपांशिवाय काही नव्हते. हार न माणण्याचा स्वभावामुळे ते पुढे सरसावले. सर्व प्रथम ५३ गुंठ्यापैकी काही गुंठ्याचे सपाटीकरण केले. राष्ट्रीयकृत बँकेकडून एक लाख ऐंशी हजारांचे कर्ज घेतले. कूपनलिका घेतली; पण वीज नव्हती. जनरेटर खरेदी केले. ठिबक सिंचन केले आणि स्ट्रॉबेरी रुजविण्याचा संकल्प केला.
स्ट्रॉबेरी रुजताना पाहून त्यांचे स्वप्नेही फुलू लागली. शेतासाठी संपूर्ण कुटुंबच एकवटले. स्ट्रॉबेरीला बहर आला. कष्टाचे चीज झाले. त्यांनी ५३ गुंठ्यातील आणखी उर्वरित क्षेत्राचे सपाटीकरण केले. त्यातही स्ट्रॉबेरी लागवडीस सुरुवात केली. शिल्लक क्षेत्रावरील दगडही आता त्यांनी दूर केले आहेत. ते वर्षाला दीड-दोन लाखांच्या भांडवलातून चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आहे.
स्ट्रॉबेरीची तोडणीस पहाटेच सुरुवात करून सकाळी अकराच्या आत भिलार येथे पाठविली जातात. तिथे एक कंपनी स्ट्रॉबेरी खरेदी करते. सर्वोत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीला १५० रुपये किलोचा भाव मिळत आहे. ‘विंटर’ आणि ‘कॅमारोजा’ जातींच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. (प्रतिनिधी)
अस्वस्थतेतून गावाकडे आलो आणि स्ट्रॉबेरीबरोबर मनालाही मातीत रुजवून घेतले. संपूर्ण कुटुंबीय शेतीकडे वळालो असून मुलांना शिक्षण मिळाला लागले आहे.
- रामदास महाडिक