खासगी ९८ बसेसवर आरटींओंची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:43+5:302021-02-07T04:36:43+5:30
सातारा : प्रवासी बसमधून रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या मालवाहतूक होत असल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी शुक्रवारी ...

खासगी ९८ बसेसवर आरटींओंची धडक कारवाई
सातारा : प्रवासी बसमधून रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या मालवाहतूक होत असल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी शुक्रवारी मध्यरात्री धडक मोहीम राबवून तब्बल ९८ खासगी बसेसवर कारवाई केली. यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले.
महामार्गावरून रात्रीच्या सुमारास अनेक वाहनचालक नियमाचे उल्लंघन करून वाहन चालवित असतात. परिणामी अपघातही होत असतात. आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, अशी भावना वाहनचालकांची होत असल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला त्यांना बळ मिळते. गत काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास असे प्रकार वाढले होते. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी रात्री धडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आली. प्रत्येक खासगी बसेसची तपासणी करण्यात येत होती. विनापरवाना वाहन चालवणे, परवान्यांच्या अटींचा भग करणे, प्रवासी बसमधून अवैधरीत्या माल वाहतूक करणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेललाइट, वायपर नसणे, वाहनांमध्ये बेकायदा फेरबदल. जादा भाडे आकरणे तसेच ऑल इंडिया परमिट बसेस महाराष्ट्र राज्यामध्ये टू-पाॅइट वाहतूक करत असल्याचे आढळून आले. अशा खासगी ९८ बसेसवर कारवाइ करण्यात आली आहे.
सातारा, खंडाळा, आनेवाडी टोलनाका आणि फलटण येथे अशा प्रकारची एकाचवेळी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मोटार वाहन निरीक्षक अनिल वैरागडे, आफ्रीण मुलाणी, आकाश गालिंदे, विशाल घनवट, धनंजय कुलकर्णी, सुरेश माळी, संदीप भोसले, मारूतराव पाटील, सुप्रिया गावडे, समीर सावंत, शरदचंद्र वाडकर, प्रशांत पाटील यांनी भाग घेतला.