रासप राज्यातील किंगमेकर पक्ष ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:03+5:302021-02-05T09:08:03+5:30
सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आहे. महाराष्ट्रात सोबतच महाराष्ट्राबाहेर देखील या पक्षाला प्रतिष्ठा आहे. आगामी काळात राज्याच्या ...

रासप राज्यातील किंगमेकर पक्ष ठरेल
सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आहे. महाराष्ट्रात सोबतच महाराष्ट्राबाहेर देखील या पक्षाला प्रतिष्ठा आहे. आगामी काळात राज्याच्या विधानसभेत रासपचे १५ आमदार निवडून आणण्याचे नियोजन केले असून रासपा राज्यातील किंगमेकर पक्ष ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.
सातारा येथील नगरपालिका मंगल कार्यालयमध्ये रासपचा मेळावा पार पडला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जानकर बोलत होते. आमदार जानकर म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघावर रासपने लक्ष केंद्रित केलेले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये रासपची ताकद मोठी आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये रासपचे आमदार निवडून येतील. राज्यामध्ये खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष जसा किंगमेकर आहे, तसा भविष्यामध्ये रासप पक्ष निश्चितपणे भूमिका बजावेल.
केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांचे देखील आमदार जानकर यांनी समर्थन केले आहे. केंद्रीय कृषिमंत्री पदावर असलेले तोमर हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना चांगली माहीत आहे. काँग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्या विधेयकामुळे निश्चितपणाने शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे, असे ते म्हणाले.
महायुती सरकारच्या काळामध्ये पशुसंवर्धन मंत्री असताना मी गायीच्या व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता भाजप व मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर नाही जे सरकार महाविकास आघाडीचे सत्तेवर आहे, त्यांची नियत चांगली नाही. आम्ही सत्तेवर असतो तर गाईच्या दुधाला ६५ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ८५ रुपये दर दिला असता, असा दावा देखील जानकर यांनी यावेळी केला.