मंडईची वाटचाल कचरा डेपोकडे
By Admin | Updated: December 2, 2014 00:26 IST2014-12-01T22:51:12+5:302014-12-02T00:26:49+5:30
महात्मा फुले भाजी मंडई : घाण पसरविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी

मंडईची वाटचाल कचरा डेपोकडे
सातारा : येथील जुना मोटार स्टँड भाजी मंडईमध्ये महिन्याभरापासून कालबाह्य झालेले चायनीजचे सॉस डबे आणून टाकत आहेत. यामुळे संपूर्ण भाजी मंडईत दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय याठिकाणी जागोजागी सडलेला भाजीपाला पडला असून, याठिकाणी व्यावसायिकही बसत असल्याने सध्या भाजी मंडईची वाटचाल सोनगाव कचरा डेपोसारखी होऊ लागली आहे.
एकीकडे स्वच्छता मोहिमेचा डंका पिटला जात असताना नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या भाजी मंडईच्या स्वच्छतेच्या प्रश्नाकडे मात्र अनेक दिवसांपासून दुर्लक्ष होत आहे. महात्मा फुले भाजी मंडईत संपूर्ण सुविधा असूनदेखील केवळ स्वच्छतेच्या अभावामुळे ही मंडई कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे.
मागील महिन्यांपासून या भाजी मंडईतील कचराकुंडीत कोणीतरी अज्ञात व्यक्ती पाच लिटरचे चायनीज सॉसचे सुमारे दोनशे-तीनशे कॅन आणून ओतत आहे.
हा कालबाह्य झालेल्या सॉसमुळे मंडईत दुर्गंधी पसरत आहे. दरम्यान, मंडईत मोकाट जनावरे व मद्यपींचा अड्डा बनली आहे. सकाळपासून मंडईत मद्यपी अड्ड्यावर पडून असतात, तर मोकाट जनावरांचे पडलेल्या भाजीपाल्यावर ताव मारून परिसरात घाण करतात. यामुळे या मंडईची अवस्था बिकट झाली आहे. (प्रतिनिधी)
मद्यपींचा वावर
शहरातील सर्वसुविधा असलेल्या या मंडईत सध्या मोकाट जनावरे जनावरे व मद्यपींचाच वावर असतो. यामुळी ही जागा म्हणजे टाकाऊ अन्नपदार्थ फेकण्याची जागा आहे.
जुना मोटारस्टँडवरील ही भाजी मंडई सर्वात मोठी आहे. ग्राहकांचाही मोठा कल याच मंडईत आहे. मंडईत सर्व सुविधा असूनदेखील केवळ दुर्लक्षामुळे आज मंडईची दुरवस्था झाली आहे. यामुुळे विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.
- फारूख बागवान