रुईचा जवान ‘वॉटर कप’चा ‘पोस्टर बॉय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:30 IST2019-01-06T23:30:06+5:302019-01-06T23:30:11+5:30
स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘आम्ही सैन्यामध्ये जस दुश्मनाला हद्दपार करतो. दुष्काळालाही तसंच हद्दपार करू,’ असा ...

रुईचा जवान ‘वॉटर कप’चा ‘पोस्टर बॉय’
स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘आम्ही सैन्यामध्ये जस दुश्मनाला हद्दपार करतो. दुष्काळालाही तसंच हद्दपार करू,’ असा निर्धार करत रुई (ता. कोरेगाव) येथील जवानांनी श्रमदानातून एका दिवसात वनतळे उभारले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पाणी फाउंडेशनने रफीक मुलाणी यांना वॉटर कप स्पर्धेचा ‘पोस्टर बॉय’ बनवून जवानांचा सन्मान केला आहे.
कोरेगाव तालुक्यातील रुई गावामध्ये अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. डिसेंबरअखेर ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होत होती. दुष्काळ आणि पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत २०१७ मध्ये सहभाग घेतला. यामध्ये लहान मुलांपासून ७५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वजण जोमाने सहभागी झाले होते. अशा वेळी सैन्य दलात काम करणारे जवान तरी कसे मागे राहणार. सैन्यातील जवानांच्या गटाने कुदळ-फावडा घेऊन गावाच्या जवळ असलेल्या ३ हजार फूट उंच डोंगरावर वनतळे बांधण्यास सुरुवात केली. सलग चोवीस तास श्रमदान करून ९ मीटर लांब, ९ मीटर रुंद आणि २ मीटर खोल असा एक भला मोठा तलाव तयार झाला.
पावसाळ्यात पडलेल्या पावसाने प्रत्येक थेंब जमिनीत मुरला. तब्बल २२ माती बंधारे आणि दोन किलोमीटरचा ओढा पाण्याने तुडुंब भरला. कित्येक वर्षांनंतर कोरड्या विहिरी तुडुंब भरल्या. हातपंपाला एका पंपात पाणी येऊ लागलं. तर ३०० फुटांवर गेलेली पाण्याची पातळी आज ५० फुटांवर आली. रुईकरांनी घेतलेल्या परिश्रमाने गावाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर पाणी फाउंडेशनने वॉटर कप २०१८ स्पर्धेचं तुफान आलंया! या पोस्टरवर गावातील एका जवानाचे छायाचित्र लावले. हे पोस्टर राज्यभरात सर्वत्र झळकले असून, रफीक मुलाणी या पोस्टर बॉयच्या निर्धाराने अनेक दुष्काळी गावांना प्रेरणा मिळणार आहे.