आमदार-प्रशासनाची भूमिका एकच हवी!
By Admin | Updated: May 24, 2016 00:58 IST2016-05-23T21:44:28+5:302016-05-24T00:58:04+5:30
अश्विन मुदगल : देसाई कारखान्यावर जाहीर सत्कार

आमदार-प्रशासनाची भूमिका एकच हवी!
पाटण : ‘तालुक्यातील जनतेच्या समस्या, तक्रारी आणि रस्त्यांच्या कामांविषयी सततचे फोन आणि पाठपुरावा पाटणचे आमदार शंभूराज देसाई करतात. रोजच त्यांचा माझ्यामागे ससेमिरा असतो. आमदार देसार्इंच्या कामाची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. आमदार आणि प्रशासन यांची भूमिका एकच असेल तर विकासाचा गाडा व्यवस्थित चालतो,’ असे मत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केले.
दौलतनगर, ता. पाटण येथे देसाई साखर कारखाना व आमदार शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘उपलब्ध निधी आणि तरतुदीमध्ये जिल्ह्यातील लोकांचा कसा फायदा होईल याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले. सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. पश्चिमेकडे जास्त पाऊस तर पूर्वेकडील तालुके कोरडे. सध्या पिण्याच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तो सोडविण्यासाठी माझे प्राधान्य राहील. यूपीएससी परीक्षेच्या निकालानुसार महाराष्ट्राची फक्त १० टक्के मुले यशस्वी झाली. यापुढे ५० टक्के मुले मराठी म्हणून अधिकारी पदावर पोहोचायला पाहिजेत.’
अश्विन मुदगल यांनी जलयुक्त शिवार योजनेचे काम जीव ओतून राबविल्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांचा राज्यातील एकमेव आदर्श जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.’(प्रतिनिधी)
मराठीतून बोलण्याचा आटोकाट प्रयत्न
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सकारात्मक उत्तर देताना मराठी भाषेतून बोलण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भाषणातून त्यांनी उपस्थित अधिकारी वर्ग व तालुक्यातील जनतेची मने जिंकली. मात्र, जिल्हाधिकारी कोणत्या गावचे कोणत्या राज्यातील याची माहिती न मिळाल्याने उपस्थितांमध्ये आतुरता राहून गेली.
दुष्काळ निवारणासाठी पाटण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने १ लाख ८० हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचेकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पराग सोमण, उपविभागीय अधिकारी धनाजी पाटील, देसाई कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, उपसभापती डी. आर. पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी, डॉ. दिलीपराव चव्हाण आदी उपस्थित होते. अॅड. डी. पी. जाधव यांचे भाषण झाले.