अभ्यासक्रमाबाबतची भूमिका बोर्डाने स्पष्ट करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:07+5:302021-02-05T09:19:07+5:30
सातारा : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अद्याप उपस्थिती कमीच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ऑनलाईन ...

अभ्यासक्रमाबाबतची भूमिका बोर्डाने स्पष्ट करावी
सातारा : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अद्याप उपस्थिती कमीच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू असताना, शासनाने अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचे घोषित केले होते. त्यामुळे परीक्षेचे पेपर काढताना संपूर्ण अभ्यासक्रमावर पेपर काढले जाणार की, ७५ टक्के अभ्यासक्रमावरच पेपर काढले जाणार याबाबत बोर्डाने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा असल्याने परीक्षेचे फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. दि.२३ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. जूनपासूनच ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने बहुतांश शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या ८० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. मात्र, ऑनलाईन अध्यापन करताना काही विद्यार्थी गैरहजर होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उजळणी घेण्यात येणार असून सराव परीक्षेचेही नियोजन केले आहे. विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, यासाठी शाळा प्रयत्नशील आहेत.
उजळणीचे नियोजन
ऑनलाईनमुळे ८० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला असला तरी पहिल्या धड्यापासून उजळणी घेण्यात येणार आहे. लेखनाची सवय विद्यार्थ्यांची मोडली असल्याने सराव परीक्षेवर विशेष भर दिला जाणार आहे. शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबर सराव परीक्षांचे नियोजन केले आहे.
परीक्षांचे धोरण अस्पष्ट
संपूर्ण अभ्यासक्रमावर ८० गुणांची लेखी व २० गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येते. परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार असल्याने एकंदर बारावीच्या परीक्षा कशा घेण्यात येतील, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेचे स्वरूप कसे असेल याबाबत स्पष्ट करणे गरजेचे आहे. अवधी कमी असल्याने सरावावर भर आहे.
कोट :
अभ्यासक्रम पूर्ण होत आला असला तरी ज्या मुलांचे काही कारणास्तव ऑनलाईन वर्ग चुकले आहेत, त्यांच्यासाठी उजळणीचे नियोजन केले आहे. मात्र, अद्याप काही पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्याने उपस्थितीचे प्रमाण कमी आहे, ते वाढण्याची गरज आहे. त्यामुळे उजळणी घेताना, मुलांचे नुकसान होणार नाही.
- मिथिला गुजर, मुख्याध्यापिका.
शाळांनी जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे बहुतांश अभ्यासक्रम पूर्ण होत आला आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यामुळे गणित, विज्ञान विषयांतील शंका शिक्षकांना विचारणे सोपे होत आहे.
- तन्वीर अजित चित्रा, विद्यार्थी
एकूण अभ्यासक्रमातील २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात येणार असल्याचे सांगितले असले तरी पेपर पूर्ण अभ्यासक्रमावर काढला जाणार की, सुधारित हे स्पष्ट करावे.
- ज्योत्सना जाधव, विद्यार्थी.