दोन्ही आमदारांची भूमिका निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:53+5:302021-09-04T04:46:53+5:30
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीच्या गेल्या वेळी लढलेल्या पक्षीय पातळीवरील निवडणुकीत यंदा बदल पाहावयास मिळणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा ...

दोन्ही आमदारांची भूमिका निर्णायक
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीच्या गेल्या वेळी लढलेल्या पक्षीय पातळीवरील निवडणुकीत यंदा बदल पाहावयास मिळणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरण बदलली आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सध्या तरी धूसर असून, आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पक्षविरहित स्थानिक आघाड्यांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कोरेगाव नगरपंचायतीची स्थापना २०१५ मध्ये झाली. त्यानंतर, २०१६ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेस अशीच लढत झाली. त्यावेळी शिवसेना-भाजप महायुतीमध्ये एकवाक्यता नसल्याने दोन वेगवेगळे पॅनेल लढले होते. शशिकांत शिंदे हे त्यावेळी आमदार असल्याने, त्यांच्या भूमिकेमुळे व राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष सुनील खत्री, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, प्रतिभा बर्गे, दिवंगत शिवाजीराव साळुंखे, शहाजीराव बर्गे, विलासराव बर्गे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने स्वतंत्र पॅनेल उभे करून, १७ पैकी ९ जागांवर विजय मिळविला. किशोर बाचल, किरण बर्गे, मनोहर बर्गे, ॲड.जयवंतराव केंजळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळविला होता.
नगरपंचायतीचा कारभार पहिले अडीच वर्षे व्यवस्थित सुरू होता. त्यानंतर, नगराध्यक्षपदाच्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली. काँग्रेसमध्येही एकवाक्यता राहिली नाही. अखेरीस दोन्ही काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी एकत्रित येऊन स्वतंत्र गट तयार केला. पक्षांतर बंदी कायद्यामुळे अविश्वास ठरावाचे राजकारण झाले नाही. नगरपंचायतीच्या पदाधिकारी निवडी आणि वेगवेगळ्या समीकरणामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयी घोडदौडीला पहिला ब्रेक लागला. त्यानंतर, नगरसेवकांच्या स्वतंत्र गटामुळे दोन्ही काँग्रेसच्या मोजक्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन नगरपंचायतीत सत्ता स्थापन केली. काँग्रेसकडे नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीने संख्याबळ जास्त असूनही उपनगराध्यक्षपद घेतले.
विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेल्या किशोर बाचल यांची उमेदवारी शिवसेनेने ऐन वेळी रद्द करत, महेश शिंदे यांना बहाल केल्यानंतर बाचल यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बरोबरीने आघाडी धर्म म्हणून मनोहर बर्गे, ॲड.जयवंतराव केंजळे यांनी राष्ट्रवादीबरोबर राहणे पसंत केले. किरण बर्गे हे खुलेपणाने महेश शिंदे यांच्या बाजूने मैदानात उतरले. सुनील खत्री यांनी स्वाभिमानी विचारमंचच्या माध्यमातून राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेत, महेश शिंदे यांचे समर्थन केले.
नगरपंचायतीच्या राजकारणाचा पहिला झटका आमदार शशिकांत शिंदे यांना बसला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना निसटत्या मतांनी पराभव झाला. मात्र, कोरेगावातील एकाही प्रभागामध्ये त्यांना मताधिक्य मिळाले नाही. तब्बल २,२०० मते जास्त घेत महेश शिंदे यांनी विजयश्री मिळविली. या निवडणुकीतही नगरपंचायतीच्या राजकारणाचे विविध कांगोरे पाहावयास मिळाले. एप्रिल, २०२० मध्ये शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर काम करण्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर, पुन्हा नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये बदल झाले.