उधारी फेडण्यासाठी चक्क रचला दरोड्याचा कट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST2021-09-23T04:45:11+5:302021-09-23T04:45:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केवळ चाळीस हजारांची उधारी फेडण्यासाठी दोघाजणांच्या डोक्यात लेबर काॅन्ट्रॅक्टरला लुटण्याचा कट शिजला आणि तो ...

Robbery plot hatched to repay the loan! | उधारी फेडण्यासाठी चक्क रचला दरोड्याचा कट!

उधारी फेडण्यासाठी चक्क रचला दरोड्याचा कट!

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केवळ चाळीस हजारांची उधारी फेडण्यासाठी दोघाजणांच्या डोक्यात लेबर काॅन्ट्रॅक्टरला लुटण्याचा कट शिजला आणि तो पुण्यातील पाचजणांच्या सराईत टोळीच्या साह्याने त्यांनी तडीसही नेला; पण लोणंद पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे त्यांनी लुटलेल्या पाच लाखांच्या रोकडचा दरोडा उघड झाला. विशेष म्हणजे कंपनीतील कामगारच या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले.

कृष्णा गायकवाड (रा. लोणंद) हे लेबर काॅन्ट्रॅक्टर असून, दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्यासुमारास तरडगाव (ता. फलटण) येथील एका कंपनीत निघाले होते. यावेळी रेल्वे पुलावर पाचजणांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून, त्यांच्या कारची काच फोडून कारमधील तब्बल ५ लाख ९ हजारांची रोकड चोरून नेली होती. लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. त्यावेळी दरोड्यातील एक एक आरोपी निष्पन्न होऊ लागला. पुण्यातून विशाल शिरवले याला ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांत पोलिसांनी या दरोडा प्रकरणात एकूण आठजणांना अटक केली. या सर्वांकडे पोलिसांनी चाैकशी केल्यानंतर दरोड्याचा कट कसा तडीस नेला, याचा उलगडा झाला.

दत्तात्रय शिरवले व विशाल शिरवले हे दोघे एकाच गावचे. दत्तात्रय हा लोणंदमधील एका कंपनीत काम करतोय. एकेदिवशी विशालने दत्तात्रयकडे, मी ४० हजारांची उधारी अनेकांकडे केलीय, बॅंकेत कर्ज मिळेल का, अशी विचारणा केली. त्यावेळी दत्तात्रयने कशाला कर्ज काढतोय, आमच्या कंपनीतील साहेबांना लुटूया; तुला पण पैसे मिळतील आणि मलाही मिळतील, असे सांगितलं. पण आता लूटमार कशी करायची?, असा प्रश्न त्यांना पडला. या दोघांचा कृष्णा चव्हाण हा ओळखीचा होता. त्याला हा कट सांगितल्यानंतर त्यानेही तयारी दर्शवली. एवढेच नव्हे, तर पुण्यातील पाचजणांना सोबत घेऊन आपण कट यशस्वी करुया, असे त्यांचे ठरले. ९ तारखेला लेबर काॅन्ट्रॅक्टर कामगारांचे पगार देण्यासाठी पैसे घेऊन येणार होते. याची माहिती दत्तात्रय शिरवले हा आरोपींना देऊ लागला. दुपारी दोनला पैसे घेऊन येणारे काॅन्ट्रॅक्टर पाचपर्यंत आले नव्हते. त्यावेळी दत्तात्रय आरोपींना फोन करून माहिती देत होता. त्याच्या अचूक माहितीमुळेच आरोपींना लेबर काॅन्ट्रॅक्टरला धाक दाखवून लुटता आले.

चाैकट : एक लाखाचे घेतले कपडे...

पाच लाखांची रोकड लुटून नेल्यानंतर त्यांनी प्रत्येकी ९० हजार रुपये वाटून घ्यायचे ठरवले होते. तत्पूर्वी सर्वांनी पुण्यामध्ये तब्बल एक लाखाचे कपडे खरेदी केले. एकमेकांना पैसे वाटून घेण्यापूर्वीच हे सर्वजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे त्यांच्याजवळील ४ लाखांची रोकड तरी पोलिसांना जप्त करता आली.

चाैकट : हे आहेत दरोडेखोर...

दत्तात्रय किसन शिरवले (वय १९), विशाल लक्ष्मण शिरवले (२०, दोघेही रा. शिरवली, ता. भोर, जि. पुणे), कृष्णा आनंदा चव्हाण (२३, रा. आसेगाव, ता. बसमत, जि. हिंगोली), रोहन सचिन भालके (१८, रा. सच्चाइमाता मंदिर, कात्रज, पुणे), शिवा उन्नाप्पा राठोड (२१, रा. बिबवेवाडी, पुणे), पवन विकास ओव्हाळ (२०, रा. बिबवेवाडी, पुणे), राजू अशोक जाधव (२०, रा. माणगाव, हिंजवडी, पुणे), प्रमोद ऊर्फ बारक्या श्रीकांत पारसे (२१, रा. भारती विद्यापीठ, पुणे परिसर)

Web Title: Robbery plot hatched to repay the loan!