लूटमारीतील फरारी आरोपीला अटक
By Admin | Updated: November 19, 2014 23:23 IST2014-11-19T22:30:14+5:302014-11-19T23:23:46+5:30
रेल्वेत चोरी : एकवीस वर्षे गायब

लूटमारीतील फरारी आरोपीला अटक
मिरज : मिरज-पंढरपूर देवाच्या गाडीत प्रवाशांच्या लूटमारप्रकरणी दत्तात्रय रामचंद्र जाधव (वय ४०) ता. प्रतापनगर, सातारा या फरारी आरोपीस मिरज रेल्वे पोलिसांनी तब्बल २१ वर्षांनी अटक केली.
सातारा येथे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दत्तात्रय जाधव यास लूटमारीच्या दोन गुन्ह्यात न्यायालयात हजर न राहता फरारी असल्याने अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले. तीन साथीदारांसोबत दत्तात्रय जाधव याने १९९३ मध्ये मिरज-पंढरपूर देवाच्या गाडीने प्रवास करणाऱ्या बाबू कृष्णा खिंडकर रा बार्शी व विलास वसंत वरयूकर (रा. पट्टणकडोली) यांना गुळवंची ते ढालगावदरम्यान चाकूचा धाक दाखवून मारहाण करून साडेसात हजार रुपये लुटले होते.
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी लूटमारीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यात दत्तात्रय जाधव, मेघराज हेगडे, अर्जुन तायाप्पा हेगडे (रा. प्रतापपूर, जत), अनिल भोसले (वय ३०, रा. सातारा) या चौघांना अटक केली होती. मात्र त्यानंतर दत्तात्रय जाधव न्यायालयात हजर न राहता गुंगारा देत होता. न्यायालयाने जाधव यास अटक करून हजर करण्याचे आदेश दिल्याने रेल्वे पोलीस जाधव यास ताब्यात घेण्यासाठी आठ ते दहावेळा सातारा येथे गेले होते. मात्र प्रत्येकवेळी जाधव प्रतापनगर झोपडपट्टीतून पसार झाला. जाधव याच्या समर्थकांनी व महिलांनी पोलिसांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केल्याने जाधव यास पकडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. (वार्ताहर)
संशयिताला कोठडी
सातारा येथे एका दरोडाप्रकरणी जाधव यास सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर रेल्वे पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांच्या पथकाने जाधव यास ताब्यात घेऊन सांगली न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने जाधव यास १४ दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे.