अतिरिक्त आयुक्तावर दरोड्याचा गुन्हा

By Admin | Updated: December 9, 2014 23:23 IST2014-12-09T21:34:59+5:302014-12-09T23:23:00+5:30

खंडाळा तालुक्यात जमिनीवरून वादावादी : दरवाजा तोडून साहित्य चोरल्याची तक्रार

Robbery on the Additional Commissioner | अतिरिक्त आयुक्तावर दरोड्याचा गुन्हा

अतिरिक्त आयुक्तावर दरोड्याचा गुन्हा

शिरवळ : पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्यासह त्यांचा पुतण्या आणि पाच अनोळखी गुंडांविरुद्ध शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. खंडाळा तालुक्यातील वडवडी गावात जमिनीच्या वादावादीतून घराचा दरवाजा फोडून मोटर, रोकड व इतर साहित्य चोरून नेल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी : वडवाडी (ता. खंडाळा येथील गट नं. १९८ या जमिनीचा वाद शिंदे व कुटुंबीयांमध्ये सुरू आहे. या जमिनीचा दावा खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातही सुरू आहे. दरम्यान, या जमिनीच्या वादातून पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, त्यांचा पुतण्या अनिकेत नामदेव शिंदे आणि पाच अनोळखी गुंडांनी संपतराव कदम यांच्या घराचा दरवाजा दगड आणि टिकावाच्या साह्याने पाडून नुकसान केले आणि १६९० रुपये किमतीची पाण्याची मोटर, १८ मीटर पाइप, दोन किलो वजनाचा दोरखंड, एक पँट आणि शर्ट तसेच रोख ५१०० रुपये घेऊन पोबारा केला, अशी तक्रार दाखल झाली आहे.
याप्रकरणी तानाजी शिंदे, अनिकेत शिंदे व पाच अनोळखी गुंडांवर शिरवळ दूरक्षेत्रात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक जी. जी. बोबडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

पोलिसांसमोर आव्हान
या घटनेची तड लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. जमिनीच्या वादावादीतून थेट दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याने, तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तानाजी शिंदे यांचे फिर्यादीत नाव आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलीस या घटनेच्या तळापर्यंत कसे पोहोचतात, याबाबत उत्सुकता आहे.

Web Title: Robbery on the Additional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.