थोरोबा डोंगरपर्यन्तच्या रस्त्याची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST2021-08-26T04:42:18+5:302021-08-26T04:42:18+5:30
मसूर : मसूर-कोरेगाव रस्त्यावर मसूरपासून म्हणजेच कोरेगाव फाटा ते थोरोबा डोंगरपर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे ...

थोरोबा डोंगरपर्यन्तच्या रस्त्याची झाली चाळण
मसूर : मसूर-कोरेगाव रस्त्यावर मसूरपासून म्हणजेच कोरेगाव फाटा ते थोरोबा डोंगरपर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकीसह वाहनांचा खुळखुळा होत आहे, तर धोकादायक खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. साधारणत: तीन किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी साचून राहिल्याने दिवसेंदिवस खड्डे मोठे होऊ लागले आहेत. या मोठ्या खड्ड्यात दुचाकी आपटून पडण्याच्या घटना अनेकदा घडत आहेत. उखडलेल्या रस्त्यावरून ये-जा करताना चारचाकी, दुचाकी वाहनांचा अक्षरशः खुळखुळा होत आहे; तर अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. संबंधितांनी पाहणी करून या रस्त्याचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
या तीन किलोमीटर अंतरातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे चुकविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी वारंवार वाहनधारक व परिसरातील नागरिकांमधून होत असताना, संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. रस्त्याचे काम झाले नसल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची हाडे खिळखिळी होऊ लागली आहेत. रस्त्याची गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी नावापुरतीच डागडुजी करण्यात आली होती. मात्र सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाला आहे. हेळगाव-मसूर हा नेहमीच वर्दळीचा रस्ता असून, या रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे.
या रस्त्यासंबंधी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्रव्यवहार करून रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या सूचना संबंधित बांधकाम खात्याकडे केल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक वेदपाठक यांनी या रस्त्याचे डांबरीकरण विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत डिसेंबर २०२० अखेर पूर्ण करणार असल्याचे पत्र खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले होते; त्यामुळे ग्रामस्थांच्यात आनंदाचे वातावरण होते; परंतु खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्र पाठवून दिलेले आश्वासनही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिका-यांनी पूर्ण केले नसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
कोट :
रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे खड्ड्यातील दगड-माती रस्त्यावर पसरत आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना रस्त्यावर आलेल्या दगड-मातीमुळे वाहने विशेषत: दुचाकी गाड्या घसरत असल्यामुळे अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्त करावी व ग्रामस्थांना दिलासा दयावा.
- सुनीता संजय कदम, सरपंच, खराडे ग्रामपंचायत
चौकट :
मसूर-कोरेगाव रस्त्यावर कऱ्हाड-कोरेगाव एस.टी. दिवसभर धावत असते. मसूरहून कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडडयातून एस.टी. धावत असताना मोबाईलमध्ये गुंग असलेल्या प्रवाशालाही कुणीही न सांगता एस.टी.कुठे आली, याची जाणीव होते, तर एस.टी.खडडयात आपटत असल्याने एस.टी.च्या इंजिनच्या आवाजापेक्षा बाकीचाच आवाज जास्त येतो. तर या मार्गावर एस.टी.त बसलेल्या प्रवाशांना एखादया पाळण्यात बसल्यासारखे वाटते.
फोटो कॅप्शन- मसूर-कोरेगाव फाटा ते थोरोबा डोंगरापर्यंत असे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.