रस्ता रुंदावला; पण कडमडली वाहनं!

By Admin | Updated: June 13, 2016 00:18 IST2016-06-12T21:33:06+5:302016-06-13T00:18:47+5:30

मलकापुरात अपघाताची भीती : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरच अवजड वाहनांचे पार्किंग; शेकडो दुचाकीही रस्त्यावर; दुर्घटनेची भीती

The road rolled down; But the vehicles lost! | रस्ता रुंदावला; पण कडमडली वाहनं!

रस्ता रुंदावला; पण कडमडली वाहनं!

मलकापूर : अपघात किंवा वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी रस्त्याचे रुंदीकरण केले जाते. मात्र, कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याचे रुंदीकरण झाल्यापासून या रस्त्याला पार्किंगचे ग्रहण लागले आहे. ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग परिसरात वाहने रस्त्यावरच पार्क केलेली आढळून येतात. एका कंपनीच्या आठ ते दहा खासगी बस दिवसभर रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. तसेच दुचाकी पार्किंगमुळेही रस्त्यावर अडथळा निर्माण होत आहे.
कऱ्हाड-ढेबेवाडी रस्ता आगाशिवनगर परिसरातून जातो. या भागात नेहमीच वाहतूक कोंडी व अपघात घडत असल्यामुळे रुंदीकरणासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ३ कोटी ४० लाखांचा निधी मिळाला. ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग या २ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. दुभाजक निर्मिती करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तुलनेत अपघाताचे प्रमाणही कमी झाले.
मात्र, ठिकठिकाणी रस्त्यावरचं पार्किंग होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी व अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संपूर्ण ढेबेवाडी खोऱ्यातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना या अस्ताव्यस्त पार्किंगचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आगाशिवनगर येथील खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीत ये-जा करण्यासाठी सावकार मोटर्स या ट्रॅव्हल्स् कंपनीने ठेका घेतलेला आहे. महिला उद्योग पासून इतरत्र कर्मचारी कामास जातात. त्यांच्या सोयीसाठी ठेका घेतलेल्या कंपनीच्या ट्रॅव्हल्स् महिला उद्योग परिसरात कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावरचं तासन्तास पार्किंग करण्यात येतात.
महिला उद्योग ते पुढे ढेबवाडीकडे रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे वाहने वेगात असतात. अशावेळी रस्त्याच्या एका लेनवर जर पार्किंग केलेली वाहने उभी असल्यामुळे लहान-लहान अपघातही घडले आहेत. मोठा अपघात घडू नये म्हणून ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग परिसरातील पार्किंगबाबत पर्यायी व्यवस्था करावी, अशा रस्त्यावरील पार्किंगबाबत पोलिस खातेही उदासिन असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)

ट्रकही रस्त्यावर उभे
आगाशिवनगर परिसरात दत्त मंदिर ते झेड.पी. कॉलनी परिसरात अनेक ट्रक व्यावसायिक आहेत. रात्रीच्या वेळी या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच ट्रकचे पार्किंग केलेले असते. त्यामुळे अपघात घडत आहेत.
एकच दिवस कारवाई
कृष्णा सरिता बझारसमोर रस्त्याच्या दुतर्फा नेहमीच दुचाकी पार्किंगच्या रांगा लागलेल्या असतात. या चौकातून एखाद्या मंत्र्यांचे येणे-जाणे असते. अशावेळी एकच दिवस पोलिसांकडून नो पार्किंगची कारवाई करण्यात येते. बाकीच्या दिवशी कारवाई करणाऱ्या पोलिसांसमोरचं राजरोसपणे पार्किंग व वडाप सुरू असते.

Web Title: The road rolled down; But the vehicles lost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.