वाहतूक कोंडीत अडकला ‘प्रतापगड’चा रस्ता
By Admin | Updated: January 4, 2017 22:23 IST2017-01-04T22:23:44+5:302017-01-04T22:23:44+5:30
पर्यटकांची वाट बिकट : रस्त्याची अवस्थाही दयनीय; तीन-चार किलोमीटर पर्यंत लागतायत वाहनांच्या रांगा

वाहतूक कोंडीत अडकला ‘प्रतापगड’चा रस्ता
महाबळेश्वर : मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देत उभा असलेला प्रतापगड किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. महाबळेश्वरात दाखल होणारे हजारो पर्यटक दररोज प्रतापगडावर हजेरी लावतात. मात्र, या किल्ल्याकडे जाणारी वाट बिकट झाली असून, पर्यटकांचा याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे, तर किल्ल्याच्या पायथ्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागत असून, वाहतूक कोंडीने अनेकांची दमछाक उडत आहे.
महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची नेहमीच रेलचेल सुरू असते. शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर असलेला प्रतापगड किल्लाही पर्यटकांना नेहमीच आकर्षिक करीत असतो. यामुळे महाबळेश्वरला भेट देणारे हजारो पर्यटक प्रतापगड किल्ला पाहिल्याशिवाय परतीच्या प्रवासाचा निघत नाहीत.
पर्यटकांचा हंगाम असो अथवा नसो प्रतापगडावर मात्र पर्यटकांची सतत वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागता आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पुरेशी जागा नसल्याने अनेक वाहनधारक रस्त्याकडेला वाहने पार्क करीत आहेत. परिणामी ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारकांची दमछाक होतेय शिवाय वेळही वाया जातो. वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली असून, पर्यटकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)
...तर पायवाटेने प्रवास
वाहतूक कोंडी झाल्यानंतर पर्यटकांना वाहतूक पूर्ववत होईपर्यंत तासन्तास वाट पाहत बसावे लागत आहे. त्यामुळे अनेक पर्यटक जिथे जागा मिळेल तिथे गाडी पार्क करून प्रतापगडाकडे चालतच कूच करीत आहेत. गडाकडे जाण्यासाठी जंगलातून एक पायवाट आहे. या वाटेद्वारेही पर्यटक गडावर येत आहे. केवळ वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना अनेक समस्या उद्भवत असून, याबाबत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना आखणे गरजेचे आहे. अन्यथा याचा पर्यटनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
रस्त्याकडेला दगडांचे ढीग...
वाडा-कुंभरोशी ते प्रतापगड या चार किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, सर्वत्र खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र, एक वर्षापासून हे काम संथ गतीने सुरू आहे. संरक्षक कठडे बांधण्यासाठी लागणाऱ्या दगडी रस्त्याकडेला टाकण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या दगडी रस्त्याकडेला ‘जैसे थे’ असून, वाहतुकीस याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.