दुर्गम जावळी खिंडीतील रस्ता होणार मजबूत
By Admin | Updated: March 25, 2016 00:01 IST2016-03-24T21:31:50+5:302016-03-25T00:01:51+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले : सातारा-जावळी तालुक्यांतील रस्ते विकासासाठी सात कोटींचा निधी मंजूर

दुर्गम जावळी खिंडीतील रस्ता होणार मजबूत
सातारा : ‘सातारा-जावळी मतदारसंघातील सातारा शहर, सातारा व जावळी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरण व पुलांच्या बांधकामांना शासनाच्या २०१६- १७ च्या अर्थसंकल्पात ७ कोटी १६ लाख ६८ हजारांची मंजुरी मिळाली आहे. या पूर्वीच्या मंजूर कामांसाठी अर्थसंकल्पात १० कोटी ८५ लाख ६४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारा शहरातून जाणाऱ्या प्रमुख राज्यमार्गांचे चौपदरीकरण, पुलांचे बांधकाम, यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी या कामांचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवले होते.
नवीन मंजूर झालेल्या कामांमध्ये सातारा तालुक्यातील महाबळेश्वर, सातारा, रहिमतपूर, विटा रस्ता, गोडोली ते अजंठा चौक रस्त्यांची सुधारणा करणे, लिंबखिंड, खिंडवाडी रस्ता रामनगर ते वेण्णा नदी पुलापर्यंत रस्त्याची सुधारणा, लिंबखिंड ते खिंडवाडी रस्ता भाग गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप रस्त्याची सुधारणा करणे, कास-बामणोली रस्त्यावर आटाळी फाटा ते घाटाईदेवी फाटा रस्ता सुधारणा करण्यासाठी ३३ लाख ६८ हजारांची मंजुरी मिळाली आहे.
मेढा गावातील रस्त्याचे रुंदीकरण करणे, जोर पाचवड, वाई, मेढा रस्ता आलेवाडी ते मार्ली खिंड रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे, भिलार, उंबरी, धावली, आलेवाडी खिंड, रेंगडी मुरा, कुंभारगणी, मोरखिंड, जन्नीमाता मंदिर, जावळी तालुका हद्द ते सायघर फाटा रस्त्याचे मजबुतीकरण करणे, पदमलेमुरा ते रेंगडीमुरा, कुंभारगणी रस्त्याचे मजबुतीकरण या कामांचा समावेश आहे.
सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील यापूर्वी मंजूर झालेल्या इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्गाचे मजबुतीकरण व पुलांच्या बांधकामासाठी २ कोटी ३८ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. जावळी तालुक्यातील यापूर्वी मंजूर असलेल्या राज्य मार्ग, ग्रामीण मार्गाचे मजबुतीकरण व पुलांच्या रुंदीकरणासाठी ३ कोटी १७ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पुलांच्या रुंदीकरणावरही निधी
सातारा शहरातील प्रमुख राज्यमार्ग रस्त्यांचे चौपदरीकरण व पुलांच्या रुंदीकरणासाठी ५ कोटी ३० लाख ६५ हजारांची अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. गोडोली ते अजंठा चौक रस्त्याची सुधारणा, गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप रस्ता दुरुस्ती, भू-विकास बँक येथील पुलाचे रुंदीकरण, जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला ते संगमनगर रस्त्याचे चौपदरीकरण, मोळाचा ओढा ते गोडोली नाका रस्ता चौपदरीकरण, पोवई नाका ते वाढे फाटा रस्ता सुधारणा करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
सातारा रिंगरोड भाग लिंबखिंड ते बोगदा रस्त्याच्या सर्वेक्षण व प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यासाठी ६ लाख १२ हजार, मोळाचा ओढा ते गोडोली नाकामधील पुलांच्या रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, सातारा-जावळी