गमेवाडी ते पाडळोशी रस्ता चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:28+5:302021-02-09T04:41:28+5:30
चाफळ : गमेवाडी ते पाडळोशी रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठवल्याने ...

गमेवाडी ते पाडळोशी रस्ता चकाचक
चाफळ : गमेवाडी ते पाडळोशी रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठवल्याने अखेर बांधकाम विभागाला जाग आली. बांधकाम विभागाने नुकतीच या रस्त्याची दुरुस्ती केली. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गमेवाडी ते पाडळोशी हा वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला आठ ते दहा किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. या रस्त्याची गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून पाडळोशीनजीक रस्ता खचला होता. त्यामुळे रस्त्यावरून पाडळोशी गावची वाहतूक काही काळ बंद झाली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्त्याची किरकोळ दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत सुरू केली. दरम्यान, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. तर मोठ्या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध करून बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणला. ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उशिरा का होईना जागे झालेल्या बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला. तर या कामाची प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया होऊन सध्या गमेवाडी ते पाडळोशी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. तूर्तास रस्त्याचे दुरुस्ती काम पूर्णत्वास गेल्याने पाडळोशी व परिसरातील वाहनचालक, प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.