आधीच रस्ता खराब त्यात खड्डे अन् झाडाझुडपांचा वेढा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:34+5:302021-03-20T04:38:34+5:30
कातरखटाव-नरवणे या मार्गांवर शिंगाडवाडी, येलमरवाडी, डांभेवाडी, अनेक वाड्या वस्त्यावरील प्रवाशांचा, नागरिकांचा दळणवळणाचा मार्ग आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता पूर्णपणे ...

आधीच रस्ता खराब त्यात खड्डे अन् झाडाझुडपांचा वेढा!
कातरखटाव-नरवणे या मार्गांवर शिंगाडवाडी, येलमरवाडी, डांभेवाडी, अनेक वाड्या वस्त्यावरील प्रवाशांचा, नागरिकांचा दळणवळणाचा मार्ग आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता पूर्णपणे ओबडधोबड झाला असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी बाभळ, बोर, येडी बाभळ, घाणेरी, अशा धोकादायक झाडाझुडपांनी रस्ता वेढला गेला आहे. त्यामुळे या मार्गांवर अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने केलेले काम आणि वर्षानुवर्षे याकडे होणारे दुर्लक्ष हे ताजे उदाहरण दिसून येत आहे.
या मार्गांवर कातरखटाव पासून बागलवस्ती ते शिंगाडवाडीपर्यंत रात्रीच्यावेळी काही अंदाज येत नाही.
रस्ता अरुंद त्यात समोरून मोठे वाहन आले की दुचाकीवाला काटेरी झाडाझुडपात गेलाच म्हणून समजायचं. अशा घटना या रोडवर वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट बघत आहे की काय असा आरोप केला जात आहे.
या खेड्यापाड्याकडे जाणाऱ्या मार्गांवर एकदा रस्त्याची ठेकेदाराकडून डागडुजी झाल्यावर काही दिवसांत रस्ता उखडलेला असतो. तरीही या कामाकडे परत मात्र प्रशासन, प्रतिनिधी डोकावून सुद्धा पाहात नाहीत.
अनेक वर्ष ग्रहण लागलेल्या या रस्त्यावर साधे पॅचवर्क
सुद्धा होतं नाही. आणि दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखे झाडाझुडपांनी रस्ता झुडपात आहे की... झुडपं रस्त्यात आहेत हेच प्रवाशी, नागरिकांना कळेना. मात्र हा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतू लागला आहे. नियमित प्रवास करणारे रस्त्याच्या अवस्थेला कंटाळले आहेत. रस्त्याची डागडुजी करण्यासाठी आणि धोकादायक झाडंझुडपं हटवण्यासाठी प्रशासनाला कधी जाग येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोट
रात्री अपरात्री धोकादायक प्रवास
सांडपाणी, पावसामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी काटेरी झाडांची भीती जाणवत असून खराब रस्त्यामुळे धोका निर्माण होतं आहे. रुग्णांना, गरोदर महिलांना या रस्त्यावरून नेताना नाहक त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणेही धोकादायक बनले आहे. दुचाकीस्वारांना अधिक धोका असून अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा प्रश्न कातरखटाव येथील मनोज सिंहासने यांनी उपस्थित केला आहे.
१९कातरखटाव
कातरखटाव-येलमरवाडी रस्ता खराब झाला असून काटेरी, वेड्या बाभळीची झाडं रस्त्यावर आल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. (छाया : विठ्ठल नलवडे)