वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:01+5:302021-03-09T04:42:01+5:30
कुडाळ : महागाईने यावर्षी उच्चांक गाठला आहे. यातच दिवाळीपासून स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीने महागाईच्या भडक्यात आणखीच भर घातली. गेल्या चार ...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
कुडाळ : महागाईने यावर्षी उच्चांक गाठला आहे. यातच दिवाळीपासून स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीने महागाईच्या भडक्यात आणखीच भर घातली. गेल्या चार महिन्यात गॅसच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ झाली असून, किराण्याबरोबरच भाजीपाल्याचेही दर भडकले आहेत. वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे. यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे.
कोरोनाच्या काळात यावर्षी अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. मिळेल तो रोजगार करून सर्वसामान्य आपला उदरनिर्वाह करू लागला. अशातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या. टप्प्याटप्प्याने अनलॉक झाल्यानंतर विस्कटलेली व्यवसायाची घडी हळूहळू रुळावर यायला लागली. यामुळे महागाई कमी होईल, अशी सर्वांनाच आशा होती.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शासनाकडून मिळणारी सबसिडीही बंद झाली आहे.
ग्रामीण भागात शासनाच्यावतीने उज्ज्वला योजनेतून अनेक लाभार्थींना गॅस कनेक्शन दिले आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या घरातही स्वयंपाकासाठी गॅस पेटत होता. महिलांचा धुरापासून बचाव व्हावा, वृक्षतोड थांबावी, यासाठी सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमती वाढत असून, सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. एका सिलिंडरसाठी तब्बल ८०० रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना गॅस खरेदी करणे परवडत नाही.
यामुळे गॅसची शेगडी गुंडाळून ठेवत ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे. आता स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात चुली पेटू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
(चौकट)
एक डिसेंबरपासून ते आजपर्यंत दर आठवड्याला स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ झालेली आहे. डिसेंबर महिन्यात ५९४ रुपयांना मिळणारा गॅस आज ८०० रुपयांवर पोहोचला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत गॅस दरात तब्बल २०० रुपये इतकी प्रचंड वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे. कोरोनाच्या काळात वाढत्या महागाईच्या झळा ग्रामीण भागातील सामान्य जनतेला अधिक प्रमाणात पोहोचत आहेत.
(कोट)
गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे गॅस खरेदी करू शकत नाही. वाढत्या महागाईमुळे आमचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गेली कित्येक दिवस बंद केलेल्या चुली आता पुन्हा पेटवण्याची वेळ आली आहे. धुराचा त्रास सहन करीत आमच्या डोळ्यांत गॅस दर वाढीने पाणी येत आहे. याकरिता सर्वसामान्यांचा विचार करून शासनाने घरगुती गॅसच्या किमती आवाक्यात ठेवाव्यात.
-रेश्मा पवार, गृहिणी