उगवत्या पिढीला पौष्टिक खुराक

By Admin | Updated: October 12, 2015 00:30 IST2015-10-11T22:08:24+5:302015-10-12T00:30:35+5:30

जागतिक अंडी दिन : विविध शाळांतील साडेसहा हजार विद्यार्थ्यांना अंड्यांचे वाटप; पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

Rising generation nutritious dose | उगवत्या पिढीला पौष्टिक खुराक

उगवत्या पिढीला पौष्टिक खुराक

संदीप कणसे - अंगापूर--माणसाचे मन, मेंदू आणि मनगट कणखर असले पाहिजे. या तीन अवयवांची परिपूर्ण वाढ होण्यासाठी दररोज व्यायामाची गरज असते, तसेच संतुलित व पोषक आहारही महत्त्वाचा असतो. ही गरज ओळखूनच ‘जागतिक अंडी दिना’चे औचित्य साधून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुमारे साडेसहा हजार उकडलेल्या अंड्याचे मोफत वाटप करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय अंडी परिषदेने दरवर्षी आॅक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी ‘अंडी दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानुसार राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जागतिक अंडी दिन साजरा करण्यात आला. सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून हा दिन साजरा करण्यात येत आहे. भावी पिढी सक्षक्त, सुदृढ आणि समृद्ध निर्माण व्हावी, आहाराविषयी जागृती व्हावी, यासाठी जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये ‘अंडी दिन’चे आयोजन करण्यात येते. यावर्षीही अंडी दिन साजरा करण्यात आला.
पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त विश्वास भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर कोळी, सहायक उपायुक्त डॉ. देवेंद्र जाधव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश्वर कदम व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून विविध संस्था आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून अंडी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सातारा जिल्ह्यातील व विविध तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना सुमारे साडेसहा हजार उकडलेल्या अंड्याचे वाटप करण्यात आले. यामधील २३५० अंडी ही येथील पशुसंवर्धन विभागाने उपलब्ध करून दिली होती. जिल्ह्यातील शाळांमध्ये अंडी वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी मान्यवरांनी अंडे हे मानवी आहारात किती उपयुक्त आहे, याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात
आली.

जिल्ह्यात येथे उपक्रम राबविला...
जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये अंडी वाटप उपक्रम झाला. यामध्ये सातारा तालुक्यातील दहा शाळांमध्ये हा कार्यक्रम पार पडला. अंगापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल, प्राथमिक शाळा क्र. १ आणि २, निगडी वंदन प्राथमिक शाळा, कामेरी-फत्यापूर येथील शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालय. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील भिलार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. कोरेगाव, पाटण, फलटण, कऱ्हाड, वाई तालुक्यांतील विविध शाळेत अंडी वाटप करण्यात आली.

जनजागृती करण्याचा उद्देश
अंड्याविषयी जागृती, प्रबोधन करणे. आहारामध्ये अंडी किती उपयुक्त असतात याची माहिती होणे, असा यामागचा उद्देश होता.



अंडी वाटप उपक्रमामुळे पशुसंवर्धन विभागाला विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. त्यासाठी शाळांचे योगदान मोठ्या प्रमाणात मिळाले. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे हा उपक्रम आम्ही यशस्वीरीत्या करू शकलो.
-डॉ. देवेंद्र जाधव, सहायक उपायुक्त पशुसंवर्धन विभाग


पशुसेवेबरोबर मानवी आहाराविषयी जागृती करून निरोगी व सशक्त पिढी घडविण्यासाठीचा हा प्रयत्न पशुसंवर्धन विभागाने केला आहे. त्याला शाळांनीही साथ दिली आहे.
- आर.सी. कांबळे, मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल अंगापूर

Web Title: Rising generation nutritious dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.