मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

By संजय पाटील | Published: April 22, 2024 09:06 PM2024-04-22T21:06:14+5:302024-04-22T21:06:46+5:30

कऱ्हाड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.

Rigorous imprisonment for the youth who molested the girl; Judgment of Karhad Court | मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

कऱ्हाड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला वीस वर्षे सश्रम कारावास आणि १ लाख ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच पिडीत मुलीला एक लाख रुपये भरपाई देण्याचा आदेशही देण्यात आला. कऱ्हाड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.

सागर शरद लोंढे (वय २८, रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील सागर लोंढे याची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. त्यानंतर फोन, मेसेजवर ते एकमेकांच्या संपर्कात होते. ही बाब मुलीच्या घरी समजल्यानंतर त्यांनी सागर लोंढे याला जाब विचारला. त्यावेळी त्याने मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगितले. तसेच तो मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला. आई आणि आज्जीशी त्या मुलीची ओळख करून दिली. आई आणि आज्जी कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर सागर लोंढे याने संबंधित मुलीवर वारंवार अत्याचार केला.

दरम्यान, पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यामुळे नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे याबाबत डिसेंबर २०२० मध्ये कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. सागर लोंढे याच्यावर बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. वरोटे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. आर. सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी या खटल्यात आठ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला वीस वर्ष सश्रम कारावास आणि १ लाख ८० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला हवालदार सुर्यकांत खिलारे यांनी सहकार्य केले.
 

Web Title: Rigorous imprisonment for the youth who molested the girl; Judgment of Karhad Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.