अंबेनळी घाटात दरड कोसळली
By Admin | Updated: June 16, 2017 13:59 IST2017-06-16T13:59:50+5:302017-06-16T13:59:50+5:30
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प

अंबेनळी घाटात दरड कोसळली
आॅनलाईन लोकमत
महाबळेश्वर , दि. १७ : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या अंबेनळी घाटात पावसामुळे दरड कोसळली. ही घटना शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. सकाळी ८.३० वाजता जेसीबीच्या साह्याने दरड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
कोकणातून महाबळेश्वरकडे येण्यासाठी पोलादपूर-महाबळेश्वर हा जवळचा मार्ग आहे. वाहतुकीचा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची सतत ये-जा सुरू असते. सध्या महाबळेश्वर व परिसरात मान्सुनने हजेरी लावली आहे. अजुन दमदार पाऊस झाला नसला तरी महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत.
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील अंबेनळी घाटात शुक्रवारी पहाटे सहा वाजता अचनाक दरड कोसळली. दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन जेसीबीच्या साह्याने दरड हटविली. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता वाहतूक पूर्ववत झाली.