वरातीत नाचण्यावरून दोन गटांत राडा
By Admin | Updated: June 1, 2014 00:58 IST2014-06-01T00:56:29+5:302014-06-01T00:58:33+5:30
सदर बझारमध्ये तलवारीने हल्ला : परस्परविरोधी गुन्हे दाखल

वरातीत नाचण्यावरून दोन गटांत राडा
सातारा : येथील सदर बझारमध्ये शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा झाला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून सुमारे १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत तलवार, कोयता आणि बाटल्यांचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, येथील सदर बझारमध्ये दोन गटांत वरातीत नाचण्याच्या कारणावरून मारहाण झाली. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गणेश हणमंत भोसले (वय ४०, रा. सदर बझार) यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सदर बझारमध्ये वरातीत नाचण्याच्या कारणावरून व बाचाबाचीतून तलवार, कोयता व बियरच्या बाटल्यांनी हल्ला करण्यात आला. यामध्ये संतोष रसाळ व शुभम विजय भोसले हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर संशयितांनी हॉटेलच्या काचा फोडून नुकसान केले आहे. गणेश भोसले यांच्या तक्रारीनुसार रितेश अरुण लाड, अरुण मोरे, पवन लाड, गुंड्या लाड आणि राहुल अरुण लाड यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दुसर्या बाजूने सारिका अरुण लाड (रा. सदर बझार) यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास म्हाडा कॉलनीत वरातीत नाचण्याच्या कारणावरून हाताने मारहाण करण्यात आली. त्यावेळी डोक्याला इजा झाली. त्यामध्ये रितेश लाड जखमी झाला आहे. सारिका लाड यांच्या तक्रारीनुसार अजय जाधव, तानाजी भणगे यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्हीही बाजूकडील चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार आणि घाडगे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)