रिक्षावाल्यांच्या ‘डीजे’वर संक्रांत !
By Admin | Updated: September 16, 2014 23:26 IST2014-09-16T22:33:31+5:302014-09-16T23:26:12+5:30
पोलीस तपासणार डेसिबल : ध्वनिमर्यादा ओलांडल्यास होणार कारवाई

रिक्षावाल्यांच्या ‘डीजे’वर संक्रांत !
कऱ्हाड : शहरात हौशी रिक्षावाल्यांची संख्या कमी नाही. रिक्षाला वेगळा ‘लुक’ देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी त्यांच्याकडून नवनविन क्लुप्त्याही लढविल्या जातात. काहीजण तर प्रवाशांना आकर्षीत करण्यासाठी ‘म्युझिक सिस्टम’चा आधार घेतात. मोठमोठ्या आवाजात गाणी लाऊन महाविद्यालयीन परीसरात असे रिक्षावाले फिरतात; पण सध्या अशा रिक्षांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षातील ‘म्युझिक सिस्टम’चा मर्यादेपेक्षा जास्त आवाज सोडणाऱ्या चालकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.
रिक्षावाल्यांविषयी सामान्यांच्या अनेक तक्रारी असतात. सध्या आणखी एका तक्रारीची त्यामध्ये भर पडली आहे. शहरातील बहुतांश रिक्षाचालक मोठ्या आवाजात गाणी लाऊन रस्त्यावरून फिरत असल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या आहेत. काही दिवसांपुर्वी एका नागरीकाने अशीच एक तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. संबंधित रिक्षाचा क्रमांकही त्या नागरीकाने पोलिसांना दिला.
तक्रारीनुसार पोलिसांनी शहरातून फिरणारी ती रिक्षा
अडवली.
वाहतुक शाखेचे कर्मचारी संदीप घोरपडे यांनी संबंधित रिक्षा पोलीस ठाण्यामध्ये आणली. त्यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासमोर पोलीस ठाण्यातच त्या रिक्षातील ‘म्युझिक सिस्टम’ सुरू करण्यात आली. ज्यावेळी म्युझिक सिस्टम सुरू झाली त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांसह कामानिमित्त पोलीस ठाण्यात आलेल्यांना अक्षरश: कानावर हात ठेवण्याची वेळ आली. डॉल्बीलाही लाजवेल असा त्या रिक्षातील ‘म्युझिक सिस्टम’चा आवाज होता.
त्यानंतर पोलिसांकडून ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली असता तो आवाज ध्वनीमर्यादेपक्षाही जास्त असल्याचे निदर्शनास आले. संबंधित रिक्षावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
वास्तविक, रिक्षांमध्ये लावण्यात येणाऱ्या गाण्यांचा आवाज हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. महाविद्यालय, बसस्थानक परीसरात अशा रिक्षा हमखास भेटतात. संबंधित रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशासह इतरांनाही त्या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांच्यावतीने सध्या एक विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. रिक्षातील म्युझिक सिस्टमचा मर्यादेपेक्षा जास्त आवाज सोडणाऱ्या चालकावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनाही त्याबाबत सुचना करण्यात आल्या असुन अशी रिक्षा आढळल्यास ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी करण्याचे व चालकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
चालकाच्या एकाग्रतेवरही परिणाम
रिक्षामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावल्याने प्रवाशासह इतरांना त्रास होताच; पण त्याहीपेक्षा चालकाला त्याचा मोठा फटका बसतो. मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे चालक रिक्षा चालविताना एकाग्र राहू शकत नाही. तसेच पाठीमागून येणाऱ्या इतर वाहनांचा हॉनही संबंधित चालकाला ऐकू येणार नाही. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालकांनी रिक्षातील ‘म्युझिक सिस्टम’चा आवाज मर्यादीत ठेवावा, अशी सुचना पोलिसांकडून करण्यात आली आहे.