‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ एसटी नव्हे आता रिक्षा!

By Admin | Updated: August 18, 2015 22:26 IST2015-08-18T22:26:22+5:302015-08-18T22:26:22+5:30

बसस्थानक प्रशासनाबाबत संताप : गाड्यांच्या बिघाडामुळेच प्रवाशांची रिक्षाला पसंती--लोकमत विशेष...

Rickshaw for ST passengers' service now! | ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ एसटी नव्हे आता रिक्षा!

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ एसटी नव्हे आता रिक्षा!

कऱ्हाड : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ म्हणून परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात एसटीची सोय केली. मात्र सध्या ‘हात दाखवा एसटी थांबवा’, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीद वाक्याचा विसर एसटी प्रशासनास पडलेला दिसतो. याउलट शहरातील रिक्षाचालकांनी प्रवाशी व विद्यार्थ्यांना तत्पर सेवा देण्यास सुरूवात केली आहे. तत्पर आणि जलद सेवेमुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ एसटी नव्हे तर आता ‘रिक्षा’च अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कऱ्हाड येथे बसस्थानकाच्या कामामुळे एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याउलट प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षावाले धावून आले आहेत. त्यांच्याकडून शाळेतील मुलांना सात रूपयांत तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दहा रूपयांत प्रवास घडवला जात आहे. जिल्ह्यातील जास्त उत्पन्न देणाऱ्या कऱ्हाड आगाराची जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची मात्र, पुरती गैरसोय होत आहे. बसस्थानकात वेळेवर गाडी येत नसल्याने त्यांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. पास काढूनही वेळ अन् पैसा वाया जात असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी एसटी प्रशासनाने केलेल्या सोयीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत एसटी प्रशासनाकडून काहीच कार्यवाही केली जात नसल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांमधून प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.शहरात सध्या चाळीसहून अधिक रिक्षा थांबे आहेत. त्या थांब्यावरून दीड हजाराहून अधिक रिक्षा शहर व परिसरात धावत असतात. बसस्थानकाचे काम सुरू असल्याने स्थानक प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात शहरातील विविध ठिकाणी स्थानकाचे स्थलांतर केले आहे. भेदा चौक, कृष्णा नाका, उपजिल्हा रूग्णालय, कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा या ठिकाणी एसटी थांबत आहेत. त्यामुळे रिक्षा संघटनांनी संबंधित ठिकाणी रिक्षा वाढवून प्रवाशांची व विद्यार्थ्यांची वाहतूक केली जातेय. शहरातील कार्वेनाका, दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, कृष्णानाका या ठिकाणी जाण्यासाठी तीस रूपये भाडे आकरणी तर नेहरू चौक, आझाद चौक, भाजी मंडई या परिसरात जाण्यासाठी वीस रूपये भाडे प्रवाशांकडून रिक्षाचालक आकारत आहेत. मध्यंतरी काही रिक्षा चालकांकडून वाढीव प्रवासभाडे आकारत प्रवाशांची लुबाडणूक केली जात होती. अजुनही ती सुरू आहे. मात्र, प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षा अजूनही तत्परतेने काम करत आहेत. (प्रतिनिधी)


५२ वर्षाचं बसस्थानक जमिनदोस्त
कऱ्हाड हे महामंडळाला मोठे उत्पन्न देणारे बसस्थानक आहे. १९६२ मध्ये बांधण्यात आलेल्या या बसस्थानक इमारतीला नुकतीच ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही इमारत जमिनदोस्त करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या बसस्थानकातून दररोज १ हजार ६०० एसटीची ये जा होत असते. हजारो प्रवाशांना उपयुक्त असलेल्या बसस्थानकाची जागा अपुरी पडत आहे.

‘कृष्णा’ अ‍ॅटो रिक्षा संघटना आक्रमक
कोल्हापूर नाका येथील उड्डाण पुलाखाली जागा द्यावी, भेदा चौक येथे रिक्षा थांबे वाढवावेत, उपविभागीय अधिकारी कार्यालय आवारात रिक्षा थांबे उभारण्यासाठी परवानगी द्यावी तसेच साई मंदीर परिसरात जादा रिक्षा थांबण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन कृष्णा कऱ्हाड तालुका अ‍ॅटो रिक्षा चालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना दिले आहे.

एसटीला अद्यापही ‘ढकलस्टार्ट’
मुख्यमंत्रीपदी असताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निधीतून बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी ११ कोटी निधी मंजूर केला आहे. मात्र, आजही या बसस्थानकातील काही एसटी नादुरूस्त अवस्थेत आहेत. दररोज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या एसटी धक्का मारून सुरू कराव्या लागत आहेत.

Web Title: Rickshaw for ST passengers' service now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.