क्रांतीदिनी ६५० आंदोलक ताब्यात
By Admin | Updated: August 9, 2016 23:49 IST2016-08-09T23:42:26+5:302016-08-09T23:49:50+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटना, कामागार संघर्ष समिती आणि अंगणवाडी सेविकांचे मोर्चे

क्रांतीदिनी ६५० आंदोलक ताब्यात
सातारा : सातारा शहराला देशप्रेम, स्वातंत्रलढ्याची परंपरा आहे. या लढवय्या जिल्ह्यात मंगळवारी (दि. ९ आॅगस्ट) आॅगस्ट क्रांतिदिन ‘आंदोलन डे’ म्हणून साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुधारित वेतन श्रेणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले. त्यानंतर पालिका कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनीही मोर्चा काढला. त्यामुळे हा क्रांतीदिन ‘आंदोलन डे’ ठरल्याची चर्चा होती.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता नेहमीपेक्षा पोलिस बंदोबस्त जरा जास्तच होता. क्रांतीदिनी आंदोलन करणाऱ्या संघटनांनी तसा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिस कायदा व सुवस्था राखण्यासाठी तयारीत होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात ४० ते ५० कर्मचाऱ्यांनी हुतात्मा स्मारकापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
याठिकाणी वेतन श्रेणी, सेवाशर्ती लागू कराव्यात, अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोलन केले. ९० टक्के करवसुलीची अट कर्मचाऱ्यांवर न लादता वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे, केंद्रीय कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना परिमंडळ निहाय दरमहा दहा हजार व बारा हजार आणि पंधरा हजारांप्रमाणे वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्राधान्याने सेवेत घ्यावे, सर्व कर्मचाऱ्यांना
पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना
दिले. (प्रतिनिधी)
पोलिस मैदानावर सुटका
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक कर्मचारी संघटनेने जेलभरो आंदोलन केले. पोलिसांनी दोन्ही संघटनेतील आंदोलनकर्त्यांना पोलिस व्हॅनमधून शहर पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिस परेड मैदानावर सोडण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी आंदोलक ताब्यात घेण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल.
अनुकंपाच्या जाचक अटी शिथिल करा
कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सातारा जिल्हा नगरपरिषद, नगरपंचायत, कामगार संघर्ष समितीच्या वतीने सातारा पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वाढत्या महागाईला आळा घाला. किमान वेतन कंत्राटदार, कामगारांसहीत १८ हजार द्यावे, अनुकंपाच्या जागा त्वरित भराव्यात, अनुकंपाच्या जाचक अटी शिथिल करून सेवेत सामावून घ्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकरी अश्विन मुदगल आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांना देण्यात आले.