अवैध उत्खननाला महसूल विभागाचा आश्रय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:03+5:302021-08-25T04:43:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : खंडाळा तालुक्यात अवैध धंदा करणारे मोकाट आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवाला फास अशी अवस्था दिसून ...

अवैध उत्खननाला महसूल विभागाचा आश्रय !
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा तालुक्यात अवैध धंदा करणारे मोकाट आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवाला फास अशी अवस्था दिसून येत आहे. अधिकारी वरवर कडक धोरण राबवित असल्याचे दाखवून पडद्यामागून वाळू उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने जनता त्रस्त झाली असून याबाबत लोकप्रतिनिधींनी लगाम घालावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील सर्व व्यवहार सुरळीत चालावेत यासाठी महसूल विभागाने काम करावे ही सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र, खंडाळा तालुक्यात उलट कारभाराची चक्रे फिरत आहेत. गावोगावी सुरू असणारा अवैध वाळू उपसा, गौण खनिज उत्खनन राजरोसपणे सुरू आहे आणि हे काम करणाऱ्या व्यावसायिकांना महसूल अधिकाऱ्यांचाच अभय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, महसूल विभागाकडून दंड वसुलीची मोहीम सुरू असल्याचे दाखविण्यासाठी सामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. स्वमालकीच्या जमिनीत उत्पन्न वाढीसाठी ताल घालणे, मातीचे सपाटीकरण करणे, माती भरणे अशा कामावरही कारवाई करून वाहने ताब्यात घेऊन मनमानी दंड वसूल केल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे ‘शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या जमिनीचा विकास करीत असाल तरी थांबा अन्यथा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. शेतकरी शेतीची कामे हाती घेतो. मात्र त्यावरही महसूल विभागाने निर्बंध लादल्याने करावे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
दुसरीकडे वाळू उपसा, मुरुम काढणे, वीट व्यावसायिकांमुळे नागरी वस्तीला होणारा त्रास यांसह अनेक प्रकारचे गौण खनिज उत्खनन सुरू असताना त्याकडे डोळेझाकपणा केला जात आहे. या मागे नक्की गौडबंगाल काय याचीच मोठी चर्चा आहे. आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे, असे छातीठोकपणे सांगणारे महसूल अधिकारी नक्की कोणाचे भले करीत आहेत हा संशोधनाचा विषय बनला आहे.
(चौकट)
नदीपात्र ओळखणे मुश्किल
खंडाळा तालुक्याच्या उत्तर सीमेवरून नीरा नदी वाहते. या नदीपात्रात वाळू उत्खननामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. नदीचे पात्र ओळखणेसुध्दा मुश्कील झाले आहे. तीच अवस्था गावोगावच्या ओढ्यांची झाली आहे. त्यामुळे त्यांचे प्रवाह जागोजागी बदलले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील हा चंगळवाद थांबणार तरी कसा हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
(चौकट)
मोठ्यांची सुटका, छोट्यांचा बळी
वाळू व्यवसाय करणारे अनेकजण महसूल अधिकाऱ्यांशी सलगीने वागत असतात. यात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी करणारे यांच्याच आश्रयाखाली राजरोसपणे गाड्या चालवतात. यांच्याबाबत तक्रार झाल्यास छापा मारण्यापूर्वीच तेथून यंत्रणा गायब होते. यामागे अधिकाऱ्यांचेच धागेदोरे असतात हे स्पष्ट आहे. मात्र, गरजेपोटी काम करणारे अनेक छोटे लोक भरडले जातात हे वास्तव आहे.