सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालू लागला असून दुष्काळी भागात ढगफुटीसदृश हजेरी लागत आहे. यामुळे माण आणि खटाव तालुक्यातील दोन रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रातही पाऊस वाढला आहे. २४ तासांत कोयनेला ४३ तर नवजा येथे ६२ मिलिमीटरची नोंद झाली आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान मान्सूनचा पाऊस पडतो. या तीन महिन्यातील पावसावरच वर्षभराचे शेती तसेच पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे पाझरतलाव, मोठी धरणेही भरुन वाहत आहेत. सततच्या पावसामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. अशातच आता परतीचा पाऊस सुरू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात धो-धो पाऊस होत आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातच परतीचा जोरदार पाऊस पडतो. सप्टेंबर ते ऑक्टोबरचे काही दिवस असा हा पाऊस असतो; पण क्षणातच धो-धो पाऊस पडत असल्याने ओढे, नाले भरून वाहतात. तलावांत पाणीसाठा होता. सध्या अशीच स्थिती या तालुक्यात होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे. कारण, खरीप हंगामातील पिके काढणीस आलेली आहेत. अशातच पाऊस पडत असल्याने पीक नुकसानीची भीती आहे.माण तालुक्यातील कुकुडवाड मंडलात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे क्षणातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. म्हसवड-मायणी रस्त्यावर पाणी आले. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. वाहनधारक तसेच परिसरातील अनेक गावांना याचा फटका बसणार आहे.त्याचबरोबर खटाव तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. येरळा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने मायणी-निमसोड रस्ताही तात्पुरता बंद झाला आहे. पाणी कमी झाल्यानंतरच वाहतूक सुरळीत होणार आहे. या परतीच्या पावसामुळे माण, खटाव तालुक्यात पावसाचा धुमाकूळ वाढू लागल्याचे चित्र आहे.
कोयनेच्या पायथा वीजगृहातून पुन्हा विसर्ग..जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २५, नवजा ६२ आणि कोयनेला ४३ मिलिमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०४.८२ टीएमसी झाला होता. धरण भरण्यासाठी सव्वा टीएमसी पाणी आवश्यकता आहे; पण पाणी आवक वाढल्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करुन २ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयना नदीपात्रातील पाण्यातही वाढ झाली आहे.