निवृत्त पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:00+5:302021-02-18T05:14:00+5:30
वडूज : वाकेश्वर, ता. खटाव येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव पांडुरंग फडतरे (६२) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन ...

निवृत्त पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
वडूज : वाकेश्वर, ता. खटाव येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव पांडुरंग फडतरे (६२) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवार, १७ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास वाकेश्वर, ता. खटाव येथील सेवानिवृत्त मुंबई पोलीस कर्मचारी ज्ञानदेव पांडुरंग फडतरे यांनी राहत्या घरातील खिडकीच्या अँगलला दोर लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. याबाबत तातडीने वडूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली.
ज्ञानदेव फडतरे हे मुंबईहून वाकेश्वर येथे त्यांच्या मूळ गावी पत्नीसह गत आठ दिवसांपूर्वीच राहायला आले होते. वाकेश्वर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापाठीमागे असलेल्या जुन्या घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. माहिती समजताच वडूज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी वाकेश्वर येथे जाऊन ज्ञानदेव फडतरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वडूज ग्रामीण रुग्णालयात आणला.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी भेट दिली. पोलीस नाईक ए. व्ही. कदम तपास करीत आहेत.