बाजार समितीचा निकाल तालुक्याचा कौल नव्हे
By Admin | Updated: August 26, 2015 22:42 IST2015-08-26T22:42:46+5:302015-08-26T22:42:46+5:30
शंभूराज देसार्इंचा टोला : विरोधकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते

बाजार समितीचा निकाल तालुक्याचा कौल नव्हे
पाटण : ‘तालुक्यातील दोन लाख ८० हजार मतदारांच्या तुलनेत पाटण बाजार समितीचे चार हजार मतदार म्हणजे केवळ १.४३ टक्के मतदार होय. तेव्हा बाजार समितीचा निकाल म्हणजे तालुक्याचा कौल नव्हे. बाजार समितीच्या निकालाची तुलना माजी आमदार पाटणकर आणि त्यांचे पूत्र विधानसभेच्या निवडणुकीशी करत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल,’ अशी टीका आमदार शंभूराज देसार्इंनी पत्रकाद्वारे केली आहे.आमदार देसाई म्हणाले, ‘पाटणकर पिता-पुत्रांनी या निकालाने एवढे हुरळून जाण्याची गरज नाही. कारण विधानसभेचा १८,८२४ मताधिक्यांनी दिलेला कौल आणि बाजार समिती अशी तुलना करून तालुक्याच्या राजकारणाची गणिते पाटणकर मांडत असतील तर त्यांचे बुद्धिकौशल्य खूप छान आहे. बाजार समितीची सत्ता ताब्यात राहिलेली पाहून माजी आमदारांनी दिलेल्या प्रतिक्रियेत शंभूराज देसार्इंनी मतदारांना फसव्या घोषणा दिल्यामुळे ते विधानसभेत निवडून आले, असे सांगितले. तेव्हा माझा १८ हजारांच्या मताधिक्याचा विजय हा पाटणकरांच्याच फसव्या घोषणांचा परिणाम होता.
अद्याप मी जमिनीवर आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी जमिनीवरच राहणार आहे. बाजार समितीची निवडणूक झाली म्हणजे आता यापुढे निवडणुका होणार नाहीत का? तेव्हा येत्या काळात पिता-पुत्र कोठे आहेत, ते जनता दाखवून देईल.
नुकत्याच झालेल्या ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पाटण तालुक्यात पार पडल्या. यामध्ये जनतेने दाखवून दिले आहे. ९५ पैकी ५७ ग्रामपंचायती देसाई गटाच्या आहेत.’ (वार्ताहर)
सरपंचांचा कोतवाल केला
मोदी लाटेमुळे माझा विधानसभेत विजय झाला, असे सांगून अकलेचे तारे तोडणाऱ्या एकाचा पाटणकरांनी सरपंचाचा कोतवाल केला असून, सभापती व्हायचे सोडून कोतवाल झालेल्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकरांच्या फळीतल्या एका पदाधिकाऱ्याला लगावला.