यवतेश्वर घाटातील डोंगराला पुन्हा वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:12+5:302021-03-09T04:42:12+5:30
पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटातील डोंगरात रविवारी वणवा लागल्याने धुराचे लोट उठले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा नष्ट ...

यवतेश्वर घाटातील डोंगराला पुन्हा वणवा
पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटातील डोंगरात रविवारी वणवा लागल्याने धुराचे लोट उठले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा नष्ट होऊन मोठे नुकसान झाले.
पश्चिमेकडील या परिसरात वणवा लागण्याचे प्रकार सर्रास घडत असून, रविवारी सकाळी अज्ञातांकडून वणवा लावल्याचा प्रकार घडला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत जळून मोठमोठी झाडे आगीत होरपळली गेली. वन्यजीवांनादेखील मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचला आहे.
घाट परिसरात वानरांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. आपले पोट भरण्यासाठी घाटातील डोंगरात पानं, फुलं, फळं अशाप्रकारचे अन्न शोधून उपजीविका करत असतात; परंतु घाटात सर्रास लागत असलेल्या वणव्यामुळे मुक्या जिवांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे.
अनेक छोटे-छोटे प्राणी, सरपटणारे जीव होरपळून पर्यावरण असंतुलित होत आहे. या विघातक कृत्याबाबत निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच प्राणिमित्रांकडून नाराजी व्यक्त होत आहे. वणवा पेटविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
चौकट
घाट परिसरातील डोंगरात मोठ्या प्रमाणावर चारा उपलब्ध होत असतो. तसेच वन्यजीवांसह अनेक पाळीव जनावरेदेखील येथे चरत असतात. परंतु वणवा लागत असल्याने शेकडो टन चारा नष्ट होत आहे.
कोट
पर्यावरणाचे संतुलन राखले जावे या हेतूने एकीकडे अनेक सामाजिक संस्था, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे अविवेकी बुध्दी असणाऱ्यांकडून वणवे लावले जात आहेत. यामध्ये कित्येक टन चारा आगीत खाक होत असून, पशुपक्ष्यांचे निवारेही नष्ट होत आहेत. येथील वनसंपदा व प्राणिसंपदा धोक्यात येऊ लागली आहे.
- पार्थ मोहिते,
पर्यावरणप्रेमी, सातारा