साताऱ्याला सेफ सिटी करण्याची जबाबदारी सर्वांची
By Admin | Updated: May 25, 2016 23:29 IST2016-05-25T22:53:47+5:302016-05-25T23:29:55+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले : हॉटेल, शाळा, महाविद्यालय, बँकांना सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन

साताऱ्याला सेफ सिटी करण्याची जबाबदारी सर्वांची
सातारा : ‘दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. त्या प्रमाणात गुन्हेगारीतही वाढ होत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, हॉटेल चालक, बँका, शाळा, महाविद्यालये, बांधकाम व्यावसायिक व इतर सर्वच संस्थांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यास त्याचा उपयोग स्वत:सह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी होईल. त्यामुळे सातारकरांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून सातारा शहराला सेफ सिटी करण्याची जबाबदारी पार पाडावी,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या वर आहे. त्यात, शाहूनगर, शाहूपुरी, विसावा नाका आणि शहरालगतच्या अनेक ग्रामपंचायती दैनंदिन जीवनासाठी सातारा शहरावर अवलंबून असतात. त्यामुळे दररोज सातारा शहरातील बाजारपेठ, रस्ते, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालये यासह सर्वप्रकारची कार्यालये, दुकाने नेहमीच गर्दीने गजबजलेली असतात. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिस बळ मात्र तोकडे पडत असल्याने वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे अवघड होत आहे.
शहरात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांची पर्स हिसकावणे, पाकीट मारणे, चेन स्नॅचिंग, मुली व महिलांची छेडछाड आदी प्रकार सातत्याने घडत असतात. अशा प्रकारांना आळा बसावा, या उद्देशाने काही वार्डामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, शहरातील व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार यांनी आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यास त्यांच्या स्वत:च्या सुरक्षिततेसह त्याठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.
शहरात शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, सराफी बाजारपेठ व इतर जीवनावश्यक वस्तूंशी निगडीत दुकानांमध्ये नेहमीच वर्दळ असते. अशा ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, आपल्या कार्यालयात, दुकानात आपण स्वत: सुरक्षित राहण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा असणे अत्यावश्यक बनले आहे. आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा गरजेची आहे, हे ओळखून सर्वांनीच आपापल्या व्यवसायाच्या, कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्यास संबंधित व्यवसाय, कामाशी निगडीत लोकांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न सुटणार आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी ठेवण्याबरोबरच आपले शहर सुरक्षित असणे तितकेच महत्त्वाचे आहे.’ असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
‘सीसीटीव्ही यंत्रणा आहे, असे समजताच जो कोणी व्यक्ती गुन्हा करण्याच्या उद्देशाने आला असेल, तो गुन्हा करणार नाही. आणि जर त्याने गुन्हा केलाच, तर सीसीटीव्ही यंत्रणेमुळे त्या गुन्हेगारास जेरबंद करणे पोलिस प्रशासनाला सोपे होईल. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी फार खर्च येत नाही. त्यामुळे आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून शहरातील सर्व व्यावसायिक, हॉटेल, लॉजचालक, सराफ, इतर सर्व प्रकारच्या संस्था, शाळा-महाविद्यालये, दुकानदार, व्यापारी या सर्वांनीच आपल्या जागेत सीसीटीव्ही यंत्रणा बसवून सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकारा घ्यावा,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.