सिटी सर्व्हेच्या मान्यतेने अडचणी निकालात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:50+5:302021-09-13T04:38:50+5:30

रहिमतपूर : ‘रहिमतपूर नगरपालिका हद्दीतील विस्तारित क्षेत्राचा सिटी सर्व्हे करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे नहरवाडी गावाचा गावठाणात समावेश होणार ...

Resolved problems with the approval of the City Survey | सिटी सर्व्हेच्या मान्यतेने अडचणी निकालात

सिटी सर्व्हेच्या मान्यतेने अडचणी निकालात

रहिमतपूर : ‘रहिमतपूर नगरपालिका हद्दीतील विस्तारित क्षेत्राचा सिटी सर्व्हे करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे नहरवाडी गावाचा गावठाणात समावेश होणार आहे. जमिनीचे वाद, बँकेची कर्ज प्रकरणे, घर बांधण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत,’ असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

कोरेगाव तालुक्यातील नहरवाडी ग्रामस्थांच्या वतीने सिटी सर्व्हे करण्यास मान्यता मिळवून दिल्याबद्दल रहिमतपूरचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा जाहीर सत्कार आयोजित केला होता. नहरवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपाध्यक्षा नीता माने, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, अविनाश माने उपस्थित होते.

बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘सिटी सर्व्हे अभावी नहरवाडीमध्ये फार मोठे प्रश्न गुंतागुंतीचे झाले होते, परंतु आता हे प्रश्न सुटणार आहेत. सुमारे दोन हजार मिळकत धारकांना सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अडतीस लक्ष रुपयांचा निधी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे.’

श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘नहरवाडीतील डांबरी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून पाण्याचा प्रश्न व रेल्वेचा प्रश्नही सोडवला जाईल. जिल्हा बँक ही आपली बँक असून शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी लाखो रुपयांचे कर्ज देत आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. लवकरच नहरवाडीचे नहरपूर असे नामांतर केले जाईल.’

शहाजी क्षीरसागर म्हणाले, ‘रहिमतपूरमध्ये दस्तनोंदणी करता यावी यासाठी कार्यालय उभे करण्यासाठी पालकमंत्री व खासदारांनी प्रयत्न करावेत.’

सुनील माने म्हणाले, ‘रहिमतपूर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणणार असून शहर सोलर सिस्टीमयुक्त बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रहिमतपुरात पंचवीस गुंठे क्षेत्रामध्ये मियावाकी जंगल उभारण्यासाठी माती उचलली म्हणून काहींनी तक्रारी केल्या त्यामुळे पाच लाख रुपयांचा दंड झाला. हा दंड नक्की भरू परंतु विरोधकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा समोर यावे आणि चांगल्या कामाला सहकार्य करावे. आम्ही दुसऱ्यांच्या कामाचा खोटा नारळ फोडत नाही. आम्ही आणलेल्या निधीचाच फोडतो.

आनंदा कोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

फोटो

नहरवाडी, ता. कोरेगाव येथील कार्यक्रमात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Resolved problems with the approval of the City Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.