शंभर फुटी रस्ता रद्द करण्याचा ठराव
By Admin | Updated: December 26, 2014 23:48 IST2014-12-26T23:29:14+5:302014-12-26T23:48:44+5:30
नगरसेवकही आक्रमक : रस्ता रुंदीकरणाचा विषय समन्वयाने सोडवावा

शंभर फुटी रस्ता रद्द करण्याचा ठराव
कऱ्हाड : शहरातील दत्त चौक ते मार्केट यार्ड हा बहूचर्चित शंभर फूट रस्ता न करण्याचा ठराव पालिकेच्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. शंभर फूट रस्ता करण्यासाठी या रस्त्यालगतच्या मिळकतधारकांनी तीव्र विरोध दर्शविला. याविरोधात लढा देण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करून संबंधितांनी पालिकेस निवेदन दिले होते. यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे होत्या. बांधकाम सभापती राजेंद्र माने यांनी दत्त चौक ते मार्केट यार्ड या शंभर फूट रस्त्याबाबतची सूचना मांडली. या विभागात अनेक रस्ते गरजेनुसार विकसित झाले आहेत. सध्या हा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी जमीन संपादन करताना अनेक इमारती पाडाव्या लागतील. या इमारतीच्या नुकसान भरपाईपोटी द्यावी लागणारी रक्कम ही कोट्यवधींच्या घरात जाईल. ही गोष्ट परवडणारी नाही. याशिवाय या रस्त्याच्या रुंदीकरणास नागरिकांचा विरोध आहे. याबाबतचे निवदेन पालिकेस दिले आहे. रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, असे राजेंद्र माने यांनी सांगितले.
या मागणीला नगरसेवक प्रमोदसिंंह कदम यांनी अनुमोदन दिले. उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंंह यादव, लोकशाही आघाडीचे सुभाष पाटील, ‘जनशक्ती’चे विनायक पावसकर यांनी मत मांडले. शंभर फूट रस्त्याचे प्रकरण कुठेही न घडणारे, असे प्रकरण असल्याची टीका सुभाष पाटील यांनी केली. रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय समन्वयाने सोडविण्यात यावा, यासाठी नगरसेवकांनी एकत्र निर्णय घेतला पाहिजे, असे पावसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रेषा मुंबईत की मलकापुरात मारल्या ?
रस्ता रुंदीकरणाचा विषय समोर आल्यानंतर मंत्रालयात याचा निर्णय घेतला गेला असला तरी नकाशात हा रस्ता किती फुटाचा करावा, याबाबतच्या रेषा मंत्रालयातील केबिनमध्ये की मलकापुरात ओढल्या गेल्या, हा संशोधनाचा भाग आहे, अशी टिप्पणी सुभाष पाटील यांनी केली.