अंगणवाडी प्रकल्पाच्या खासगीकरणास विरोध
By Admin | Updated: November 18, 2014 23:33 IST2014-11-18T20:59:51+5:302014-11-18T23:33:09+5:30
साताऱ्यातून शंभर जण दिल्लीला रवाना

अंगणवाडी प्रकल्पाच्या खासगीकरणास विरोध
सातारा : एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या (आयसीडीएस) पुनर्गठनाच्या नावाखाली अंगणवाड्यांचे खासगीकरण करण्याची योजना आखली जात असून, त्याला अंगणवाडी कर्मचारी संघटनेने विरोध दर्शविला आहे. या निर्णयाविरोधात दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनासाठी जिल्ह्यातून शंभर जण मंगळवारी रवाना झाले.
‘आयसीडीएस प्रकल्पाच्या पुनर्गठनामध्ये दहा टक्के अंगणवाड्या कंपन्यांना चालविण्यास देण्यात येणार असून, आठ टक्के अंगणवाड्यांचे रूपांतर पाळणाघरात होणार आहे. ही पाळणाघरेही खासगी असतील. तिसरी सेविका निवडून अंगणवाडी सकाळपासून सायंकाळपर्यंत चालविण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच मध्यान्ह आहारही केंद्रीय पद्धतीने शिजवून त्याचे वितरण होणार आहे. अंगणवाड्यांच्या खासगीकरणाच्या दिशेनेच हा प्रवास सुरू आहे,’ असे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा आनंदी अवघडे यांनी सांगितले.
या निर्णयाविरोधात देशभरातून एक कोटी सह्या संकलित करण्यात आल्या असून, जिल्ह्यातून आठ हजार सह्या घेण्यात आल्या आहेत. किशोरवयीन मुली, बालके, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी उपयुक्त ठरलेल्या या प्रकल्पाचे सार्वत्रिकीकरण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याने २१ नोव्हेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदान ते जंतरमंतर असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अवघडे म्हणाल्या. (प्रतिनिधी)