अशासकीय समिती सदस्यांचे राजीनामे घ्या!

By Admin | Updated: April 2, 2016 00:12 IST2016-04-01T22:28:17+5:302016-04-02T00:12:19+5:30

उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे : बैठकीची पूर्वसूचना दिली जात नसल्याचा आरोप--पंचायत समिती मासिक सभा

Resignation of non-official committee members! | अशासकीय समिती सदस्यांचे राजीनामे घ्या!

अशासकीय समिती सदस्यांचे राजीनामे घ्या!

कऱ्हाड : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमाातून नेमण्यात आलेल्या अशासकीय समिती सदस्यांच्या बैठकीबाबत काहीही पूर्वकल्पना दिली जात नाही. असे करायचे असेल तर आम्हाला सदस्य तरी का करून घेता? तुमच्या कामात आमची अडचण होत असेल तर आमचे राजीनामे घ्या, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य लक्ष्मण जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. यावेळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा सादर केला जात असताना सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. दयानंद पाटील यांनी सांगितले की, ओंड येथील एक ग्रामस्थ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात गेला असता त्याच्यावर पंधरा दिवसांपर्यंत तात्पुरते उपचार करण्यात आले. त्यानंतर मात्र जखमेवर प्लास्टिक सर्जरी करावी लागेल, असे सांगून पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात त्याला पाठवण्यात आले. त्यामुळे संबंधित रुग्णाला हजारो रुपयांचा खर्च करावा लागला. वेणुताई चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच त्याला खासगी रुग्णालयाात जाण्यास सांगितले असते तर एवढा खर्च करण्याची वेळ त्याच्यावर निश्चितच आली नसती.
लक्ष्मण जाधव म्हणाले, ‘कामथी येथील एका प्रसूती झालेल्या महिलेला १०८ क्रमांकाची सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक झळ सोसून खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागला. ही सरकारी रुग्णवाहिका तसेच वेणुताई चव्हाण रुग्णालयाची रुग्णवाहिकाही अशा प्रकारे रुग्णांना हव्या त्या वेळी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकवेळा गैरसोयींना सामोरे जावे लागते. याबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने रुग्णवाहिका चालवणाऱ्या कंपनीशी चर्चा करावी, अशी सूचना सभापतींनी केली. कृषी विभागाचा आढावा सादर केला जात असताना अजय शिरवाडकर यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या विविध योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. मृदा तसेच जलसंधारणाच्या कामात तांत्रिक ज्ञान असणाऱ्या कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच सहभागी करून घेण्याची सूचनाही त्यांनी केली. सभापतींनी अशा प्रकारच्या निकृष्ट कामांवर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे,’ अशी सूचना केली.
वीज वितरण कंपनीने प्रत्येक वर्षी किमान २०० विहिरींसाठी त्वरित वीज कनेक्शन उपलब्ध करून द्यावे. सरकारच्या योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरी तर खोदून ठेवल्या आहेत . मात्र त्यांना विहिरीतून पाणी उपसण्यासाठी वीज कनेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना सभापतींनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. तीन महिन्यांपूर्वी शेरे परिसरातील अनेक ग्रामस्थांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून गेली आहेत. त्यांचा सर्व्हे करून संबंधित ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशी मागणी अनिता निकम यांनी केली.
राजश्री थोरात यांनी लटकेवाडीतील मोकळा विजेचा खांब त्वरित हटविण्याची मागणी केली. अकाईचीवाडी तलावामधून कृषी पंपासाठी देण्यात आलेली कनेक्शन तहसीलदारांच्या आदेशाशिवाय सुरू केली जाणार नाहीत, हे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अजय शिरवाडकर यांनी टंचाई आराखड्यातील कामे सुरू करण्याची मागणी केली. कामांना सुरुवात झाली तर येत्या दोन महिन्यांतील संभाव्य पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल, असे यावेळी शिरवाडकर यांनी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी झाडे लावून संगोपन करावे
पर्यावरणविषयक जागृतीचा भाग म्हणून पंचायत समितीने पुढाकार घेऊन प्रत्येक सदस्य, पदाधिकारी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांवर प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी सोपवावी, अशी सूचना रूपाली यादव यांनी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून असा उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. असा उपक्रम राबविल्यास झाडांची संख्या वाढून दुष्काळासारख्या समस्येला तोंड देणे सोपे होईल, असे सदस्यांनी सांगितले.


पाण्यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक...
गटविकास अधिकारी फडतरे यांनी यावेळी सांगितले की, टेंभू, उत्तरमांड प्रकल्पासह मेरवेवाडी तलावाचे पाणी कऱ्हाड तालुुक्यातील गावांना देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय झाल्यानंतर टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Resignation of non-official committee members!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.