अपंगांसाठीच्या दारात चारचाकींसाठी आरक्षण
By Admin | Updated: December 9, 2014 00:29 IST2014-12-08T23:57:44+5:302014-12-09T00:29:32+5:30
प्रशासन सुस्त : अपंग सप्ताह साजरा करुनही येईना जाग

अपंगांसाठीच्या दारात चारचाकींसाठी आरक्षण
सातारा : सातारा जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या समाजकल्याण विभागाकडून अपंगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून असंख्य अपंग लाभार्थी येत असतात. त्यांना आत येणे सुसह्य व्हावे, म्हणून जिल्हा परिषदेच्या इमारतीत छोटा दरवाजा तयार केला आहे. याठिकाणीच चारचाकी वाहनांसाठी आरक्षण तसेच मोटारसायकली लावलेल्या असतात. त्यामुळे अपंगांना इमारतीत जाताना कसरत करावी लागत आहे.
कोणत्याही शासकीय इमारत किंवा सार्वजनिक ठिकाणी अपंगांना सहज वावरत यावे, त्यांची तीनचाकी सायकल, स्कूटर आत आणता यावी यासाठी ठराविक उताराचा सिमेंटपासून उतार देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील दोन नंबरला छोटा दरवाजा तयार केला आहे. त्या ठिकाणी उतारही केला आहे.
या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूलाच समाजकल्याण विभाग आहे. याठिकाणाहून अपंगांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांची माहिती घेण्यासाठी संबंधित लाभार्थी नियमित येत असतात. असे लाभार्थी स्वत:च्या तीन चाकी सायकल किंवा स्कूटर घेऊन येत असतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची वाहने उभी करण्यासाठी आरक्षण केलेले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी रिकामी जागा असेल तेथेच ते उभे करावे लागतात. रिकाम्या जागेत वाहन उभे केल्यानंतर दरवाजापर्यंत कसरत करत जावे लागते. या दरवाजाच्या जवळच चारचाकी वाहनांसाठी जागा आरक्षित केली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपंगांसाठीसाठी जागा आरक्षित करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेतून अपंग सप्ताह साजरा केला गेला. मात्र, अपंगांच्या समस्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या ठिकाणचे अडथळे हटवून अपंगांसाठीचा मार्ग सुसह्य करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
मार्गात उभारले अडथळे
जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांनी मोटारसायकली अस्ताव्यस्त लावू नयेत, म्हणून या गेटच्या दारात बांबूच्या साह्याने अडथळे तयार केले होते. त्यामुळे प्रवेशद्वाराच्या दारात अपंगांना गाडी लावण्यासाठी रिकामी जागा मिळाली तरी त्यांना वाहन लावल्यानंतर लांबून वळसा घालून इमारतीत जावे लागत होते.