आरक्षणात महिला ‘राजी’ तर पतींची ‘ना’ राजी
By Admin | Updated: April 15, 2015 23:58 IST2015-04-15T21:44:32+5:302015-04-15T23:58:36+5:30
कऱ्हाड तालुका : ९९ ग्रामपंचायतीत महिला तर ९५ ग्रामपंचायतींमध्ये पुरुषांना मिळणार सरपंचपदाची संधी

आरक्षणात महिला ‘राजी’ तर पतींची ‘ना’ राजी
कऱ्हाड : प्रत्येक क्षेत्रात महिलांना आरक्षण दिले जावे, असे सांगत महिलांना आरक्षण दिले गेले. मात्र, आता निवडणूक विभागाने महिलांना आरक्षण देत कऱ्हाड तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी संधी दिली आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींत महिला, तर ९५ ग्रामपंचायतींमध्ये पुरुष सरपंचपद आरक्षित केले आहे.
या आरक्षण निवडीतून महिलांना देण्यात आलेल्या संधीचे महिला वर्गातून ‘राजी’ होत स्वागत करण्यात आले आहे, तर दुसरीकडे पुरुषांमधून आपल्याला काही ठिकाणी संधी न मिळाल्याने ‘ना’ राजी व्यक्त होत आहे.
कऱ्हाड तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी बुधवारी आरक्षण जाहीर झाले. या जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी महिला पद आरक्षित ठेवण्यात आले आहे.
तर ९५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी पुरुषपद आरक्षित ठेवण्यात आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सरपंचपदासाठी जास्त आरक्षित ठेवण्यात आली असल्याने आता ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या खुर्चीवर बसून मोठ्या दिमाखात आता कारभारीनीही गावचा कारभार चालवणार आहेत.
पाच वर्षांच्या कालावधीसाठी तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींमधील सरपंचपद आता महिलांना भूषविण्यात येणार आहे. निवडणूक विभागाने महिलांसाठी आरक्षणामुळे दिलेल्या संधीचे महिलांवर्गातून निवडणूक विभागाचे स्वागत केले जात
आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या कारभारात महिलांना मोठ्या
प्रमाणात संधी दिली असल्याने
पुरुष वर्गातून नाराजी व्यक्त होत
आहे.
जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी पडलेल्या आरक्षणामध्ये सर्वसाधारण महिला वर्गात ५५ महिलांचा समावेश असून, ५४ पुरुषांचा समावेश करण्यात
आला आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गात १६ महिलांची आणि १६ पुरुष वर्गाची आरक्षित संख्या ठेवण्यात आली आहे. तर अनुसूचित जमाती महिला आरक्षणात एक जागा तीही महिलासाठी आरक्षित ठेवण्यात
आली आहे. मागास वर्गामध्ये पुरुषांसाठी २६ आणि महिलांसाठी २७ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारण वर्गासह अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती, मागास वर्ग अशा चार वर्गांमध्ये ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी )
कुठे सूनबाई तर
कु ठे सासूबाई
कऱ्हाड तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींवर महिलांना सरपंचपदासाठी आरक्षित केले असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी कुणाची नियुक्ती करायची याची चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली आहे. तर कुठे गावातील सूनबाईला तर कु ठे अनुभव असणाऱ्या सासूबाईला संधी द्यायची, अशी चर्चा होत आहे.
कारभारात आता ‘कारभारीणीही’
घराप्रमाणे गावातील प्रत्येक गोष्टीचा कारभार हा ‘कारभाऱ्याने’ म्हणजे पुरुषांनी हाकायचा असतो. ही कारभाराची संकल्पना फार वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. मात्र, आता बदलत्या काळानुसार गावाचा कारभार चालवण्यामध्ये महिला वर्ग मागे नसल्याचे दिसून येत आहे. त्यात आताच्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणावर लक्ष दिल्यास यामध्ये पुरुषवर्गापेक्षा जास्त महिलांची संख्या आहे. त्यामुळे आता नव्या प्रशासनाच्या नव्या निवडीनुसार गावच्या कारभारात आता कारभारीनीलाही आपली कसब दाखवता येणार आहे, हे नक्की.
तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने तालुक्यातील गावागावांत सरपंचपदासाठी कु णाला उभे करायचे, याविषयावर सध्या चर्चा केली जात आहे.