वाळू माफियांवर गुन्हा नोंद करा
By Admin | Updated: December 26, 2014 00:51 IST2014-12-25T21:47:01+5:302014-12-26T00:51:56+5:30
अजिनाथ केवटे : म्हसवड पालिका जागेचा नगरसेविकेच्या पतीकडून वापर

वाळू माफियांवर गुन्हा नोंद करा
सातारा : ‘माणगंगा नदीतून परवानगी नसताना वाळूउपसा करण्यात आला आहे. जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकारी आणि वाळू माफियांवर फौजादारी गुन्हा नोंद करावा. तसेच म्हसवडच्या नगरसेविकेच्या पतीने पालिकेच्या मालकीची सुमारे तीन एकर जागा वापरण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही प्रकरणांतील संबंधितांच्या विरोधात कारवाई करावी,’ अशी मागणी अजिनाथ केवटे यांनी केली आहे.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केवटे म्हणाले, ‘माणगंगा नदीतील व नदीला मिळणाऱ्या ओढ्यात गेल्या चार वर्षांपासून वाळू उचलण्याची परवानगी नाही. तरीही येथील सुमारे पाचशे कोटींच्या वाळूची चोरी झाली आहे. याला सर्वस्वी शासकीय अधिकारी जबाबदार आहेत. या विरोधात म्हसवड तलाठी कार्यालयापुढे दोन दिवस उपोषणही केले. प्रांताधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यापुढे काहीही झाले नाही.
वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची तसेच माण तहसीलदार यांच्या गाडीच्या चालकाच्या फोन नंबर व संपत्तीची चौकशी करावी. गुन्हा नोंद करावा. यासाठी मी दि. ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे, असेही केवटे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
तीन एकर जागेवर ताबा...
म्हसवड शहराच्या हद्दीत पालिकेच्या मालकीच्या सिटी सर्व्हे नंबर ३५५ मध्ये बाळकृष्ण सदाशिव पिसे यांची वखार व लाकूड कापण्याची मशीन आहे. ही जागा अंदाजे दोन ते तीन एकर आहे. बाळकृष्ण पिसे हे नगरसेविका निर्मला पिसे यांचे पती आहेत. शासकीय जागेचा वापर होत असताना मुख्याधिकारी काहीही कारवाई करीत नाहीत. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. तीस दिवसांत याबद्दल कार्यवाही न झाल्यास पालिकेसमोर उपोषण करणार आहे, असा इशाराही अजिनाथ केवटे यांनी दिला आहे. याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.