मरिआईचीवाडी वगळता सर्व मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:48+5:302021-02-05T09:09:48+5:30

सातारा : खटाव तालुक्यातील कटगुण येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी वगळता ...

Report of all dead hens except Mariaichiwadi is negative ... | मरिआईचीवाडी वगळता सर्व मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह...

मरिआईचीवाडी वगळता सर्व मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह...

सातारा : खटाव तालुक्यातील कटगुण येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी वगळता सर्व ठिकाणचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पोल्ट्रीधारकांना दिलासा मिळाला आहे. आता मृत कावळ्यांच्याच अहवालाची प्रतीक्षा आहे.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावांत तर खंडाळा आणि कऱ्हाउ तालुक्यातील प्रत्येकी एका गावांत मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर खटाव तालुक्यातील कटगुणमध्ये शनिवारी आणि रविवारी काही कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या अंगावर व्रणही होते. त्यामुळे मुंगसाच्या हल्ल्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते.

कटगुणमधील मृत कोंबड्यांचे नमुने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. या अहवालानुसार कटगुणमधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मंगळवारी आलेल्या अहवालानुसार कुडाळमधील मृत कोंबड्यांचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पशुपालकांतील भीती कमी होण्यास मदत झाली आहे.

चौकट :

मृत कोंबड्यांची नोंद नाही...

जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मागील आठ दिवसांपासून या अहवालांची प्रतीक्षा आहे. तर मागील तीन दिवसांत जिल्ह्यात कोठेही मृत कोंबड्यांची नोंद झालेली नाही. त्यामुळे पोल्ट्रीधारकांतील भीतीचे वातावरण कमी झालेले आहे.

.......................................................

Web Title: Report of all dead hens except Mariaichiwadi is negative ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.