कऱ्हाडच्या सौंदर्यात प्रतिकृतींमुळे भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:39 IST2021-03-17T04:39:31+5:302021-03-17T04:39:31+5:30
टाकाऊपासून टिकाऊ : विविध कलाकृती साकारल्या कऱ्हाड : येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासह ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शहरात अनेक उपक्रम हाती ...

कऱ्हाडच्या सौंदर्यात प्रतिकृतींमुळे भर
टाकाऊपासून टिकाऊ : विविध कलाकृती साकारल्या
कऱ्हाड : येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासह ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शहरात अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. टाकाऊपासून बनविलेल्या टिकाऊ शोभेच्या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, या प्रतिकृतींमुळे शहराचे रूपडे पालटले आहे.
कऱ्हाड पालिकेने वर्षभरापूर्वी ‘वेस्ट टू बेस्ट’चा नारा दिला. त्यामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अव्वल राहत बाजी मारली आहे. रोजचे काम आटोपून पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी शहरात सुंदर आरास उभी करत आहेत. त्यांना तो छंदच जडला आहे. त्या सर्व कलाकृती नागरिकांसाठी खुल्या असून, आकर्षित करत आहेत. त्यामुळे ‘वेस्ट टू बेस्ट’मध्ये पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी ‘बेस्ट’ ठरले आहेत. आरोग्य साहित्यापासून पालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कलाकुसरीमधून कऱ्हाडात जणू कचऱ्यालाच सुंदर आकार मिळत आहे. हे कर्मचारी दैनंदिन कामातून वेळ काढून कलाकृती साकारत आहेत.
कर्मचाऱ्यांनी खराब टाकाऊ वस्तूंपासून मासा, हत्ती, फुलपाखरू, पिगी बॅग, जीन्स पॅन्टचा सुंदर बगीचा, टाकाऊपासून मोठे फुलपाखरू, मोर, पक्ष्यांसाठी घरटी, झाडे लावण्यासाठी कुंड्या तयार केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी गतवर्षी हत्ती, मासा आणि कासवाचे शिल्प साकारले आहे. त्यासाठी भंगार, प्लॅस्टिकचे डबे, बाटल्या, खराब लोखंडी साहित्याचा वापर केला आहे.
फोटो : १६केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाड पालिका कर्मचाऱ्यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शिल्प साकारले असून, सध्या कासवाची प्रतिकृती तयार करण्यात कर्मचारी व्यस्त आहेत.