स्वच्छतागृहांचे नूतनीकरणही लालफितीत
By Admin | Updated: April 21, 2015 01:00 IST2015-04-21T00:36:49+5:302015-04-21T01:00:15+5:30
दोन महिन्यांपासून शौचालय बंद : तहसीलदार कार्यालयात पुरुषांना आधार आडोशाचा तर महिलांना एस. टी. बसस्थानकाची वारी

स्वच्छतागृहांचे नूतनीकरणही लालफितीत
कोंडवे : कोणत्या ना कोणत्या कारणाने तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भलतीच कोंडी होऊ लागली आहे. काम सुरू आहे, असे कारण पुढे करून गेल्या काही महिन्यांपासून येथील शौचालये बंद अवस्थेत आहे. याचा त्रास महिलांसह ज्येष्ठांना होत आहे.तहसीलदार कार्यालयात कोणत्या तरी निमित्ताने अनेकांचे जाणे होते. काम केव्हा होईल, हे निश्चित माहीत नसल्यामुळे अनेकजण येथे जेवणाचा डबाही घेऊन येतात. तालुका आणि जिल्ह्यातून विविध कामांच्या निमित्ताने येणाऱ्यांचा राबता तहसीलदार कार्यालयात सकाळपासूनच सुरू असतो.
बघणाऱ्यांनाही कोडं पडावं इतक्या प्रकारचे लोक तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वावरत असतात. कोणाला स्टॅम्प हवा असतो, तर कोणी दाखल्यासाठी आलेला असतो, कोणाला जमिनीवर नाव चढवायचं असतं, तर कोणाला नाव कमी करून घ्यायंच असतं, कोणाला वडिलोपार्जित संपत्तीचा शोध घ्यायचा असतो, तर कोणी स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यासाठी येथे हेलपाटे घालत असतो.
समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकाचा संबंध येणारे कार्यालय म्हणून तहसीलदार कार्यालयाकडे पाहिले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या कार्यालयाचे काम सुरू असल्याचे कारण सांगून येथील शौचालये बंद करण्यात आले आहे. एका दिवसासाठी शौचालय बंद करण्यात येईल, असे सांगून गेल्या दोन महिन्यांपासून हे शौचालय कुलपात आहे.
तहसीलदार कार्यालयात पाचशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यात महिलांचीही संख्या लक्षणीय आहे. सकाळी दहा वाजता येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नैसर्गिक विधीला जाण्याची कार्यालय आवारात सुरक्षित सोय उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांची कुचंबणा होत आहे.
काही अधिकाऱ्यांनी स्वत:च्या केबिनमधील शौचालयाचा वापर महिलांनी करावा, यासाठी परवानगी दिली आहे. पण येथे जाताना महिलांची कुचंबणा होत आहे. म्हणून दुचाकी वाहन असलेल्या महिला तडक एस.टी. स्टॅण्डमध्ये जाणं पसंत करत आहेत.
नैसर्गिक विधी रोखून धरणे अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. म्हणून तहसीलदार कार्यालय परिसरात तात्पुरत्या स्वरूपात तरी शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी येथे येणाऱ्यांनी ‘लोकमत’कडे केली आहे. (वार्ताहर)