कोरड्या पाटांकडं पाण्यानं फिरविली पाठ
By Admin | Updated: May 7, 2015 00:20 IST2015-05-06T23:32:55+5:302015-05-07T00:20:41+5:30
खटाव तालुक्यात टाहो : प्रादेशिक पाणीयोजना सुरू करण्याबरोबरच तलावात पाणी सोडण्याची मागणी

कोरड्या पाटांकडं पाण्यानं फिरविली पाठ
राजीव पिसाळ -पुसेसावळी व परिसरात पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पारगाव तलाव कोरडा पडला आहे. उरमोडीच्या पाटांना पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासली की पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना जलसंजीवनी ठरते. सन २००३-०४ पासून टंचाईच्या काळात या योजनेतून संपूर्ण खटाव तालुक्याला पाणीपुवठा करण्यात येत होता. एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१३ या अठरा महिन्यांच्या कालावधीत ही योजना मोठ्या प्रमाणावर सुरू होती. सध्या परिसरातील विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे.
टँकर सुरु करण्याची मागणी
पुसेसावळी व थोरवेवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच पुसेसावळी व आठ गावची नळ पाणीपुवठा योजना सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. खटाव तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यातच सध्याचा उन्हाळा हा भयानक असून शिवारं करपून गेली आहेत. रखरखीत उन्हात फिरवून जनावरांच्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. कुसळं खाऊन अर्धपोटी जनावरं गोठ्यात बांधावी लागत आहेत. त्यातच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यामुळे जनावरांसह माणसांचेही घशाला कोरड पडू लागली आहे. पावसाळा सुरू व्हायला अजून
एक महिन्याचा कालावधी आहे. मे महिन्यातील कडक उन्हाचा सामना कसा करावा, या प्रश्नाने
येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची आठवण
पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही पुसेसावळी, राजाचे कुर्ले, गोरेगाव वांगी, वांझोळी, भूषणगड, जयरामस्वामींचे वडगाव, वडी, चोराडे, शिरसवडी या गावांकरिता करण्यात आली होती.मात्र, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली तरच या योजनेची आठवण होते. इतर कालावधीत ही योजना बंद असल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर देखभाल दुरुस्तीचा भार प्रशासनाला उचलावा लागतो.
पारगाव तलावात पाणी सोडावे
ही योजना कायमस्वरूपी सुरु व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच शेतीच्या पाण्यासाठी पारगाव तलावात पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरु व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच शेतीच्या पाण्यासाठी पारगाव तलावात पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.