‘दूरध्वनी’च्या लाभापासून ग्राहक दूरच
By Admin | Updated: December 29, 2014 23:48 IST2014-12-29T20:14:56+5:302014-12-29T23:48:20+5:30
तेरा वर्षांची प्रतीक्षा : आदर्की-बिबी केंद्राला मिळेना कर्मचारी

‘दूरध्वनी’च्या लाभापासून ग्राहक दूरच
आदर्की : फलटण पश्चिम तालुक्यातील गावे दूरध्वनी, इंटरनेट, सेवेने जोडण्यासाठी आदर्की बुद्रुक, बिबी येथे दूरध्वनी केंद्र १५ वर्षांपूर्वी झाले. परंतु १३ वर्षांपासून कर्मचारी नसल्यामुळे दूरध्वनी सेवेपासून ग्राहक दूरच राहिले आहेत.
फलटण पश्चिम भागातील मोठ्या प्रमाणात चाकरमनी बाहेर गावी असल्यामुळे भारत सरकारच्या भारत संचारच्या माध्यमातून २० वर्षांपूर्वी आदर्की बुद्रुक, बिबी येथे दुरध्वनी केंद्र उभारून आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, कापशी, आळजापूर, मोठेवाडी, टाकोबाईची वाडी, बिबी, मलवडी, मुळीकवाडी, घाडगेवाडी, वडगाव, वाघोशी, कोऱ्हाळे, दूरध्वनी सेवा देण्यास आली.
त्यावेळी दुरध्वनी घेण्यासाठी तीन-चार वर्षे अनामत रक्कम भरून पाच वर्षे वाट पाहून दूरध्वनी सेवा घेतल्याने नातेवाईकांशी संपर्क होऊ लागला. परंतु तेरा वर्षांपासून बिबी, आदर्की, दूरध्वनी केंद्रांना कर्मचारी नाही, त्यामुळे काही ग्राहकांनी वारंवार तक्रारी करूनही सेवा सुरळीत न झाल्याने बंद केली.
पाच वर्षांपासून मोबाईल टॉवर, इंटरनेट सेवा सुरू केल्यामुळे बँका, पतसंस्था, शाळा, माध्यमिक विद्यालय, आदींनी इंटरनेट सेवा घेतली, परंतु आदर्की व बिबी येथे भारत संचार कंपनीचा कर्मचारी नसल्यामुळे इंटरनेट, दुरध्वनी सेवा पाच ते सहा दिवस बंद असते. (वार्ताहर)
उडवा-उडवीची उत्तरे
अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन दूरध्वनी बंद करण्याच्या ग्राहकांना सूचना देतात. तरी वरिष्ठ अधिकारी वर्गाने आदर्की व बिबी येथे कर्मचारी नेमावेत, अशी मागणी ग्राहकांतून हात आहे.